व्हाईट हाऊसने स्पष्ट केली भूमिका
वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आणण्यात आलेल्या महाभियोग प्रस्तावाच्या अनुषंगाने जी चौकशी केली जाणार आहे त्याला कोणतेही सहकार्य केले जाणार नाही असे स्पष्टीकरण व्हाईट हाऊसच्यावतीने करण्यात आले आहे.
अमेरिकेतील लोकशाही प्रक्रिया उलथून टाकण्याचा घटनाबाह्य प्रयत्न या द्वारे विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या स्टेफनी ग्रिशाम यांनी आज पत्रकारांशी बोलताना नमूद केले की अध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधातला हा इम्पीचमेंट प्रस्ताव म्हणजे एक राजकीय खेळी आहे. त्याला आम्ही सहकार्य करायचे नाही असे ठरवले आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी काहीही चुकीचे केलेले नाही हे विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनाही ठाऊक आहे.
अध्यक्ष ट्रम्प हे लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले अध्यक्ष आहे त्यांची राजवट उलथून टाकण्याचा त्यांचा इरादा आहे. डेमोक्रॅट नेत्याच्या संबंधातील माहिती मिळवण्यासाठी युक्रेनच्या अध्यक्षांवर दबाव टाकल्याच ट्रम्प यांच्यावर आरोप आहे. त्यांनी युक्रेनच्या अध्यक्षांना या संबंधात केलेल्या फोन कॉलची माहिती ट्रम्प प्रशासनातीलच एका अधिकाऱ्याने दिली होती. त्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांच्या विरोधात हा इम्पीचमेंट प्रस्ताव आणला आहे.