कर्मचाऱ्यांना पगार मिळणेही झाले मुष्किल
हेग: संयुक्तराष्ट्रांचे कामकाज चालवण्यासाठी त्यांच्या सदस्य देशांकडून जो निधी मिळणे अपेक्षित आहे तो निधी अमेरिकसह अन्य राष्ट्रांनी थकवल्यामुळे या संघटनेला आता आपले कामकाज चालवणे जिकीरीचे बनले असून पुढील महिन्यापासून आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन कसे द्यायचे हीच मोठी समस्या आता त्यांच्यापुढे निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.
संयुक्तराष्ट्र संघांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेर्रेस यांनीच ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की ही संघटना आता कमालीची आर्थिक अडचणीत सापडली आहे. या संस्थेकडील राखीव निधी संपत आला असून आता या महिन्याच्या अखेरीला आपल्या कर्मचाऱ्यांना वेतनही देण्याची मारामार आहे. अनेक राष्ट्रांनी आपली निर्धारीत वर्गणी या संघटनेकडे जमा केलेली नाही.
अनेक देशांनी वर्षानुवर्षांची थकबाकी साठवली आहे. यात अमेरिकेचाहीं समावेश आहे. अमेरिका, ब्राझील, अर्जेन्टिना, मेक्सिको आणि इराण सारख्यादेशांनी आपली गेल्या कित्तेक दिवसांची वर्गणी संयुक्तराष्ट्रांमध्ये जमा केलेली नाही. त्यामुळे संघटनेला काम करणे अवघड झाले आहे. विविध ठिकाणी मानवातवादी दृष्टीकोनातून मदत कार्य करण्यासह अशांत टापू मध्ये शांती सैन्य पाठवण्याचे कामही ही संघटना करीत असते.
त्याखेरीज गरीब देशाच्या मदतीसाठीचे अनेक उपक्रम या संघटनेतर्फे जगभर राबवण्यात येत असतात. या सगळ्या कामाला आता संयुक्तराष्ट्रांकडे निधीची मोठी चणचण निर्माण झाली आहे. संघटनेचे सदस्य असलेल्या 64 देशांनी आपली निर्धारीत वर्गणी या संघटनेकडे जमा केलेली नाही. संघटनेकडे सध्या 34 हजार कर्मचारी काम करीत आहेत. जगातल्या ज्या 129 सदस्य देशांनी आपली वर्गणी जमा केली आहे त्यांचे सरचिटणीसांनी आभार मानले आहेत.