सर्व मॉलच्या पार्किंगचे होणार सर्वेक्षण

पोलीस आयुक्‍तांचे आदेश : वाहतूक नियमनासाठी बसविणार सीसीटीव्ही

पिंपरी – शहराच्या विविध भागात असलेल्या मॉलमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे शहरातील मॉल आणि त्यांची पार्किंग यांचे सर्व्हेक्षण करण्यात यावे, असे आदेश पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी पोलिसांना दिले आहेत. शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर विविध मॉल आहेत.

या मॉलमध्ये हजारो ग्राहक खरेदीसाठी येत असतात. मात्र काही मॉलमध्ये पार्किंगसाठी नियमबाह्य पद्धतीने शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क द्यावे लागू नये, म्हणून काही वाहन चालक रस्त्यावरच वाहतुकीला अडथळा येईल, अशा पद्धतीने वाहने उभी करतात. यामुळे भविष्यात आग लागल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशामक दलास घटनास्थळी पोहचण्यास अडचण होऊ शकते. तसेच मॉलमध्ये येणाऱ्या एकूण ग्राहकांपैकी दहा टक्‍के ग्राहकांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय असणे गरजचे आहे.

मॉलच्या परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे यांना शहरातील सर्व मॉलचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मॉल प्रशासनाला ग्राहकांच्या वाहनांच्या योग्य पार्किंगची व्यवस्था करण्याबाबत सांगण्यात येणार आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांवर थेट कारवाई केली जात नाही. मात्र वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करताना दुचाकीस्वारांना हेल्मेट न घातल्याबाबत कारवाई केली जाते. वाहतुकीचे नियम तोडल्यास करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईतील दंडाच्या रकमेत केंद्र शासनाने मोठी वाढ केली आहे.

याबाबतची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी होईल. शहरातील 15 चौकांचे सर्व्हेक्षण करून त्यात बदल करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यामध्ये हिंजवडी, तळेगाव, चाकण आदी ठिकाणचा खर्च राज्य सरकारच्या गृह खात्यास करण्यास सांगितले आहे. तसेच हिंजवडीमधील वाहतुकीत केलेल्या बदलामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यात यश आल्याचेही आयुक्‍तांनी यावेळी सांगितले.

सहकार्य नाहीच
खूपच वेगाने विकसित झालेल्या या शहरात गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या ब्रॉंडचे शोरुम्स, मॉल्स, रुग्णालये आणि चित्रपटगृहांनी बस्तान बसवले आहे. नियमानुसार या सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानांनी त्यांच्या ग्राहकांना पार्किंगची सुविधा नि:शुल्क उपलब्ध करुन देणे आवश्‍यक आहे. परंतु पार्किंगलाच उत्पन्नाचा मोठा स्त्रोत मानत अवास्तव शुल्क आकारले जात आहे. यामुळे येथे येणारे ग्राहक बाहेरच पार्किंग करतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. याबाबत यापूर्वीही पोलीस अधिकाऱ्यांनी या व्यवसायांच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे. परंतु वाहतूक पोलिसांना कोणतेही सहकार्य करण्यात आले नाही. त्यामुळे नियमानुसार कारवाई होणे आवश्‍यक झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.