खंडणीचा गुन्हा दाखल ः एमआयडीसी भोसरी पोलिसांनी केली अटक
पिंपरी – लघुउद्योजकांकडे जबरदस्तीने पाच हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या गणपती मंडळाच्या तीन कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि. 18) सायंकाळी भोसरी एमआयडीसी येथे घडली. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
जावेद गुलाब पठाण (वय 24), रूपेश मलकू जाधव (वय 19) आणि राजू जयराम पवार (वय 22, तिघेही रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) अशी खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. हलागौडा शिवलिंग ओंकार (वय 43, रा. दुर्गा निवास इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुख्य आरोपी पठाण व त्याचे साथीदार हे फिर्यादी हलागौडा यांच्या भोसरी एमआयडीसी येथील साई इंजिनिअरिंग या कंपनीत आले. त्यांनी “क्रांतीवीर तरुण मित्र मंडळ’ असे नाव लिहिलेली पाच हजार रुपयांची पावती जबरदस्तीने फिर्यादी हलागौडा यांना दिली. तसेच पैसे नेण्यासाठी नंतर येतो, असे सांगून जर वर्गणी दिली नाही तर पाहून घेतो, अशी धमकी दिली. दोन महिन्यांपूर्वी मीच तुम्हाला मारले होते, ओळखले ना? असे म्हणून शिवीगाळ करून पुन्हा धमकी देऊन आरोपी निघून गेले. अधिक तपास पोलीस एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.