नगर – निवडणूक प्रक्रियेत त्रुटी राहणार नाहीत, गोंधळ निर्माण होणार नाही याची निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुसरे निवडणूक प्रशिक्षण सत्र सहकार भवन सभागृहात सोमवारी पार पडले.
यावेळी गमे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, झेडपी सीईओ आशिष येरेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले, ईव्हीएम व बॅलेट पेपरद्वारे पार पडणारे मतदान यामधील फरक समजून घ्यावा. फॉर्म 16 हा या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा असतो. फॉर्म 16 चे काटेकोरपणे अवलोकन करावे. केंद्राध्यक्षांनी मतदान केंद्रावरील सर्व घटनेच्या वेळोवेळी नोंदी ठेवाव्यात.
निवडणुकीच्या परवानग्यांसाठी तहसीलमध्ये एक खिडकी कक्ष विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांना उमेदवारांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या तात्काळ प्राप्त करुन घेण्यासाठी तालुका पातळीवर तहसील कार्यालयात एक खिडकी सुविधा कक्षांची स्थापना करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदेश दिले आहेत.