पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज (मंगळवारी) सन 2023-24 या अर्थिक वर्षासाठी 7 हजार 127 कोटी 88 लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. यंदाचे अंदाजपत्रक 718 कोटी 68 लाख रूपयांच्या शिलकीचे असून कोणत्याही प्रकारची करवाढ, दरवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
अंदाजपत्रकात नवीन प्रकल्पांचा अभाव असून जुन्यांच योजनांना नव्याने मुलामा देण्यात आला आहे. महापालिकेचे 41 वे तर प्रशासकीय राजवटीतील पहिलेच अंदाजपत्रक आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे 2023-24 या वर्षाचे अंदाजपत्रक मुख्य वित्त व लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना मंगळवारी (दि.14) सादर केले. सिंह यांनी अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह लेखा विभागाचे अधिकारी, विविध विभागाचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.