पुणे – नाट्यगृहात वाजणाऱ्या मोबाइलमुळे कलावंतांमध्ये नाराजी असून यावर बंधने घालण्यासाठी जॅमर बसवण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद देत, जॅमर बसवणार असल्याचे पालिकेच्या विद्युत विभागाने जाहीर केले. मात्र, यावरून केंद्रीय दूरसंचार विभागाने महापालिकेला फटकारले असून “कोणत्याही ठिकाणी जॅमर बसवण्यासाठी स्वतंत्र नियमावली आहे. तसेच त्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे,’ असे कळविले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी मोबाइल वाजल्यामुळे नाटक थांबवण्याची वेळ आली. त्यामुळे कलावंतांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अभिनेते सुबोध भावे यांनीही नाट्यगृहात जॅमर बसविण्याची मागणी केली. त्याला प्रतिसाद देत नाट्यगृह देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या विद्युत विभागाने “प्रमुख नाट्यगृहांत जॅमर बसवणार आहे,’ अशी घोषणा केली. तसेच ही नाट्यगृहे महापालिकेची असल्याने तेथे अडचण नसल्याचे सांगितले. याबाबतची वृत्तंही प्रसिद्ध झाली. मात्र, या वृत्तांची गंभीर दखल दूरसंचार विभागाने घेतली आहे.
दूरसंचार विभागाचे याबाबतचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यांच्या नियमावली ऑनलाइन उपलब्ध असून त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. या विभागाचे कार्यालय पुण्यात असून लवकरच त्यांना महापालिकेची भूमिका पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे. त्यानंतर जॅमर बसवण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल
– श्रीनीवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, मनपा