महाबळेश्वर – ख्रिसमसनंतर आता नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज झाले असून या थंड हवेच्या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी होत आहे.
महाबळेश्वरला दरवर्षी विविध हंगामात देशभरातून लाखो पर्यटक येतात. सध्या ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटक दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी महाबळेश्वरनगरी सज्ज झाली असून पर्यटकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी परिसर सुशोभित करण्यात आला आहे.
सरत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, लॉजेसला आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करून पर्यटकांना आकर्षित करण्यात येत आहे. महाबळेश्वर व परिसरातील प्रसिद्ध आर्थर सीट, केट्स पॉइंट, लॉडविक पॉइंट, सूर्योदयासाठी प्रसिद्ध असलेला विल्सन व सूर्यास्तासाठीचा प्रसिद्ध असलेला मुंबई पॉइंट यासह माचूतर गणपती मंदिरामागील नयनरम्य प्लेटो पॉइंट, लिंगमळा धबधबा, वेण्णा लेक ही पर्यटनस्थळेही पर्यटकांच्या गर्दीने फुलली आहेत. या प्रेक्षणीय स्थळांसह श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत आहे.
किल्ले प्रतापगड व हस्तकला केंद्रलाही हजारो पर्यटक भेटी देत आहे. गुलाबी थंडीतही पर्यटक स्ट्रॉबेरी ज्यूस, क्रीम, आइस्क्रीम, बर्फाच्या गोळ्यांचा आस्वाद घेत आहेत. वेण्णा लेक, मुंबई पॉइंट परिसरात पर्यटकांना घोडेस्वारीचा आनंद लुटता येत आहेत. महाबळेश्वरचे वैभव असलेल्या वेण्णा लेकला तर मुंबईतील चौपाटीचे स्वरूप आले आहे.
पर्यटक लेकमधील नौकाविहारासोबत चटपटीत खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. बच्चे कंपनीसाठी गेम्सची धूम असून सर्वत्र “जत्रे’चा माहोल आहे. स्ट्रॉबेरीपासून बनविलेली खाद्यपदार्थ, मक्याची गरमागरम कणसे, फ्रॅंकी आदी फास्टफूड खवय्यांच्या जिभांचे चोचले पुरवत आहेत. वेण्णा लेक परिसरातील निसर्गसौंदर्य आणि सूर्यास्ताच्या वेळी दिसणारी निसर्गाच्या छटा पर्यटक अनुभवत आहेत.