- पशूवैद्यकीय विभागाचा निर्वाळा
पिंपरी – करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी असतानाच, आता बर्ड फ्ल्यूची भीती नागरिकांना सतावत आहे. मात्र, अद्यापतरी बर्ड फ्ल्यू सदृश्य एकही केस उद्योगनगरीत आढळली नसून, शहरातील प्राणी आणि पक्षी सुरक्षित आहेत, असल्याचा निर्वाळा महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाने दिला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येने राज्याचे लक्ष वेधले होते. आता कुठे रुग्णसंख्या घटू लागली आहे. मात्र आता देशभरातील पक्ष्यांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात अद्याप बर्ड फ्लूचा कोणताही प्रकार आढळलेला नव्हता. मात्र, परभणीतील मुरुंबा गावात एका दिवसांत तब्बल 900 कोंबड्या अचानक मृत्यूमुखी पडल्या आहेत. मृत कोंबड्यांचे सॅंम्पल्स पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे देखील दोन दिवसांत 26 कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत.
दररम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील दुर्गादेवी टेकडी व टाटा मोटर्समधील तळ्यात परदेशातील पक्षांचे हिवाळ्यात आगमन होत असते. पक्षीप्रेमी व छायाचित्रकारांसाठी ही एक सुवर्णसंधी असते.
मात्र, आता या दोन्ही ठिकाणी असलेल्या पक्षांमध्ये कोणतेही लक्षणे, आजार आढळलेला नाही अथवा मृत पक्षी सापडले नाहीत.
चिकन विक्रीवर फारसा परिणाम नाही
पिंपरी-चिंचवड शहरात मावळ तालुका, बारामती व पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पोल्ट्री फार्मकडून चिकनचा पुरवठा केला जात आहे. बर्ड फ्ल्युच्या धास्तीमुळे सध्या शहरातील चिकन विक्रीवर फारसा परिणाम जाणवत नाही. त्यामुळे प्रति किलोच्या दारत कोणतीही घट झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी नागरिकांच्या मनात बर्ड फ्ल्यूची धास्ती नसल्याचे चित्र आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला काहीठिकाणी असलेल्या नैसर्गिक अधिवासात हिवाळ्यात परदेशातील पक्षांचे वास्तव्य असले, तरीदेखील बर्ड फ्ल्यूसदृश्य कोणताही आजार असलेला प्राणी अथवा पक्षी शहरात अद्यापही सापडलेला नाही. बर्ड फ्ल्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत राज्य सरकारकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करू.
– डॉ. अरुण दगडे, पशू वैद्यकीय अधिकारी,
पिंपरी-चिंचवड महापालिका