सॅन दिएगो, दि. 12 – अमेरिकेतील सॅन दिएगो येथील सफारी पार्कच्या प्राणिसंग्रहालयातील गोरिला माकडांनाही करोना झाला असल्याचे निदर्शनाला आले आहे. अमेरिकेत प्राण्यांनाही करोनाची लागण झाल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. या प्राणिसंग्रहालयातील आठ गोरिलांना ही लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना अन्य प्राण्यांपासून दूर ठेवण्यात आले आहे.
प्राणिसंग्रहालयातील करोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांपासूनच माकडांना ही लागण झाली असावी असा कयास व्यक्त केला जात आहे. हे प्राणिसंग्रहालय 6 डिसेंबरपासून सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. गोरिला माकडांचे 98.4 टक्के डीएनए मानवाशी मिळत जुळते आहे. हे प्राणी मानवाशी मिळून मिसळून वागत असतात.
ही माकडे विशिष्ट जातीची असून त्यांची अमेरिकेत मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याने त्यांची संख्या जवळपास 60 टक्क्यांनी घटली आहे असे सांगीतले जाते. गोरिलांना झालेल्या करोनावरील उपचारासाठी कोणती पद्धती वापरायची याची चिंता त्यांच्यावर उपचार करणाऱ्या प्राणी तज्ज्ञांमध्ये आहे.
या माकडांना एकमेकांपासून दूर ठेवले तर ती जगण्याची शक्यता कमी असल्याने त्यांना एकत्रितच पण अन्य प्राण्यांपासून वेगळे ठेवण्यात येत आहे. प्राण्यांच्या संपर्कात असलेल्या कर्मचाऱ्यांनाही आता तेथे प्राण्यांच्या जवळ जाताना अधिक काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.