…तर परीक्षा केंद्रे बंद होणार!

परीक्षा केंद्र बंद करण्याची कार्यपद्धत 
दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांसाठी सुधारित निकष लागू

पुणे – इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत सुधारित निकष लागू करण्यात आले आहेत. या निकषानुसारच नव्याने परीक्षा केंद्राची निर्मिती करावी लागणार आहे. अटी व शर्तीची पूर्तता न करणारी परीक्षा केंद्रे बंद करण्याची कारवाई महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.

नक्षलवादी, दुर्गम, ग्रामीण भागात परीक्षा केंद्र देताना समस्या निर्माण होतात. यामुळे या निकषात बदल करण्यासाठी मागणी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून तसेच विविध घटकांकडून करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन निकष अद्ययावत करण्यासाठी राज्य मंडळाच्या पुणे कार्यालयामार्फत मंडळ अधिकारी, कर्मचारी, सदस्य यांची समिती गठीत करण्यात आली होती.

या समितीची सभाही झाली. चर्चेअंती सुधारित निषक प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. फेब्रुवारी-मार्च 2020 च्या परीक्षेपासून सुधारित निकषाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. नवीन परीक्षा केंद्र निर्मितीसाठी प्रस्ताव आपल्या शिफारशीसह 31 ऑगस्टपासून सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांवर कार्यवाही होणार नाही.

ज्या केंद्राचे नाव सलग तीन वर्षांहून अधिक काळासाठी उपद्रवी केंद्राच्या यादीत समाविष्ट असल्यास परीक्षा केंद्र बंद करण्यास पात्र राहणार आहे. मंडळाने सोपविलेल्या कामकाजात कोणताही गैरप्रकार आढळल्यास, सूचनांचे उल्लंघन केल्यासही संबंधित केंद्र बंद करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्र बंद करण्यापूर्वी शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. खुलासा सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदतही देण्यात येणार आहे. यावर 15 ऑक्‍टोंबरपर्यंत निर्णय घेण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्र बंद करण्याचा पूर्ण अधिकार विभागीय मंडळाच्या सक्षम समितीस राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.