…तर कॉंग्रेस कार्यकर्ते आघाडीचा धर्म पाळणार नाही

हडपसर कॉंग्रेसचा इशारा : मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्याची मागणी

हडपसर – आघाडीचा धर्म पाळून हडपसर मतदार संघ कॉंग्रेसला सोडावा अन्यथा हडपसरमध्ये कॉंग्रेस कार्यकर्ते आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाहीत, तर वेळप्रसंगी भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित राहून भाजप उमेदवाराचा प्रचार करू, असा इशारा हडपसर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत तुपे यांनी दिला.

हडपसर विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेस कार्यकर्ता मेळावा कन्यादान मंगल कार्यालयात झाला, त्यावेळी तुपे बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिजित शिवरकर, हडपसर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित घुले, चंद्रकांत मगर, माजी नगरसेविका कविता शिवरकर, पार्वती भडके, जयसिंग गोंधळे, बाळासाहेब गोंधळे, नितीन आरु, माया डूरे, इंदिरा तुपे, सुलतान खान, रमेश चौधरी, नूर शेख, ज्ञानेश्‍वर कांबळे, विजय जाधव उपस्थित होते.

लोकसभेला मतदारसंघात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे काम केले, मात्र त्यांनी आणि आताही येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसला विश्‍वासात घेतले नाही, असेही तुपे म्हणाले.

जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत कॉंग्रेस संपणार नाही : बाळासाहेब शिवरकर
हडपसर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस संपवली, असे अनेकजण वावड्या उठवत आहेत. मात्र, जोपर्यंत बाळासाहेब शिवरकर येथे आहेत, तोपर्यंत इथली कॉंग्रेस संपणार नाही. उलट जो कोणी कॉंग्रेस संपवण्याचा विचार करत असेल त्यांना मात्र आम्ही संपवू, असेही शिवरकर म्हणाले. मला कधी पदाचा किंवा सत्तेचा मोह नसल्याने मी शेवटपर्यंत कॉंग्रेस सोडणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.