नवी दिल्ली : भाजपा खासदार आणि भारतीय कुस्तीपटू महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी कुस्तीपटूंनी गेल्या महिन्याभरापासून जंतरमंतरवर आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, काल सरकारविरोधात नव्या संसद भवनात महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. या महापंचायतीसाठी जंतर मंतरहून नव्या संसद भवनाकडे जाणाऱ्या कुस्तीपटूंविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आणि काही कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेताच त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.या सर्व घडामोडींदरम्यान निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने या आंदोलनाविरोधात ट्वीट केलं आहे. या ट्विटने सध्या नवा वाद निर्माण झाला आहे.
ट्वीट डॉ.एन. सी. अस्थना या आयपीएस अधिकाऱ्याने हे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, “गरज पडली तर गोळ्याही घालू. पण तुमच्या सांगण्यावरून नाही. आता तर कचऱ्याच्या पिशवीप्रमाणे तुम्हाला फरफटत नेऊन फेकून दिलं आहे. कलम १२९ अंतर्गत पोलिसांना गोळ्या घालण्याचा अधिकार आहे. उचित परिस्थितीत पोलीस तेही करतील. पण ते समजण्यासाठी शिक्षित असणं गरजेचं आहे. मग, भेटूया पोस्टमार्टम टेबलवर,” असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. तर त्यांच्या ट्विटला कुस्तीपटू बजरंग पुनिया याने चोख उत्तर दिले आहे.
ज़रूरत हुई तो गोली भी मारेंगे। मगर, तुम्हारे कहने से नहीं। अभी तो सिर्फ कचरे के बोरे की तरह घसीट कर फेंका है। दफ़ा 129 में पुलिस को गोली मारने का अधिकार है। उचित परिस्थितियों में वो हसरत भी पूरी होगी। मगर वह जानने के लिये पढ़ालिखा होना आवश्यक है। फिर मिलेंगे पोस्टमाॅर्टम टेबल पर! https://t.co/tQ0ROlQBzP
— Dr. N. C. Asthana, IPS (Retd) (@NcAsthana) May 28, 2023
आयपीएस अधिकाऱ्याचे संतापजनक ट्वीट पाहून भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने ते ट्विट रिट्वीट करत “हे आयपीएस अधिकारी आम्हाला गोळ्या मारण्याचं बोलत आहेत. भाई समोर उभा आहे, सांगा कुठे यायचंय गोळी खायला? शपथ आहे, पाठ नाही दाखवणार, छातीवर तुझी गोळी झेलू. हेच आता आमच्यासोबत करणं बाकी राहिलं असेल तर हेही चालेल”, असे सडेतोड दिले आहे.
ये IPS ऑफिसर हमें गोली मारने की बात कर रहा है। भाई सामने खड़े हैं, बता कहाँ आना है गोली खाने… क़सम है पीठ नहीं दिखाएँगे, सीने पे खाएँगे तेरी गोली। यो ही रह गया है अब हमारे साथ करना तो यो भी सही। https://t.co/jgZofGj5QC
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) May 29, 2023
दरम्यान, आंदोलक कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी रविवारी जंतरमंतरवर घडलेल्या गोंधळप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम १४७, १४९, १८६, १८८, ३३२, ३५३ आणि पीडीपीपी कायद्याच्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने दिली आहे.