पालिकेच्या रुग्णालयांत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उभारावेत
पक्षनेत्यांची आयुक्तांकडे मागणी
पुणे – महापालिकेने खासगी रुग्णालयांवर अवलंबून न राहता पालिकेच्याच दवाखान्यांमध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटिलेटरची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षांनी केली आहे. याबाबतचे पत्र, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे वसंत मोरे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
शहरात करोना बाधितांचा आकडा वाढत असताना, पालिकेकडून या रुग्णांवर उपचारासाठी खासगी हॉस्पिटलचे बेड राखीव ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, त्या ठिकाणी प्रत्यक्षात रुग्ण गेल्यानंतर तेथे रुग्णास बेड मिळत नाहीत. परिणामी अनेक रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागत आहे. गंभीर रुग्णांसाठी भविष्यात आवश्यक असलेले ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटिलेटर कमी पडणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने आताच खबरदारीचे उपाय योजावेत, असे पत्रात म्हटले आहे.