जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव
पुणे – “मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन केले. यातून मराठा समाजाची एकजूट दिसून आली. त्यामुळे अत्यंत कष्टाने मिळालेले मराठा आरक्षण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात टिकवू शकले नाही. याबाबत मराठा समाजामध्ये संतप्त भावना असून, समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवल्यास तीव्र आंदोलन करू,’ असा इशारा मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्यातर्फे देण्यात आला.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्यातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यालयाला घेराव घालून मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले. त्यानंतर सविस्तर चर्चा करण्यात आली.
निवेदन देताना मोर्चा समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, राजेंद्र कुंजीर, सचिन अडेकर, बाळासाहेब अमराळे, तुषार काकडे, अमर पवार, युवराज दिसले, अश्विनी खादे, सारिका जगताप आदी उपस्थित होते. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, पुणे, हवेली प्रांताधिकारी, पुणे शहर आणि हवेली तहसीलदार आदींसह शहरातील 11 अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
पोलीस भरती जाहीर करणे अन्यायकारक
राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरही मोर्चाने नाराजी व्यक्त केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय वगळता कोणतीही भरती करणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने दिले होते. मात्र, आता मराठा आरक्षणाला स्थगिती असताना, पोलीस भरती जाहीर करणे अन्यायकारक असून, त्यामुळे मराठा तरुणांची संधी जाणार आहे, अशी खंतही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.