फ्ल्यू सारखी लक्षणे दिसल्यास ‘कोविड-19 काळजी केंद्रात’ उपचार घ्यावा
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन
पुणे – फ्ल्यूसारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी महापालिकेतील कोविड-19 काळजी केंद्रात उपचार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. काही नागरिक फ्ल्यूसारखी (सर्दी, खोकला, ताप आदी) लक्षणे आढळून आल्यानंतर स्वत: उपचार करवून घेत आहेत किंवा स्थानिक खासगी डॉक्टरांकडे जात आहेत. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर 10 दिवसांनंतर या रुग्णांमध्ये आजार गंभीर किंवा जीवघेणा झाल्याचे आढळून येते.
त्यामुळे नागरिकांना फ्ल्यूसारखी लक्षणे दिसून आल्यास फ्ल्यू क्लिनिकमध्ये दाखवून घ्यावे. अशा क्लिनिकमधील डॉक्टर नागरिकांच्या लक्षणाच्या आधारे आपली “कोविड-19’साठी चाचणी करायची आवश्यकता आहे अथवा नाही याबाबत निर्णय घेतील. तर कोव्हिड-19 साठी चाचणी करावयाची आवश्यकता असेल तर पुणे शहरात 19 ठिकाणी चाचणीकरिता नमुने घेण्याची सोय आहे. यापैकी काही नावे पुढीलप्रमाणे आहेत – नायडू रुग्णालय, ससून सामान्य रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध, भारती विद्यापीठ, डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, भोसरी रुग्णालय, के. ई. एम. रुग्णालय, सह्याद्री रुग्णालय, कोथरूड अशी आहेत.
जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनाही विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही रुग्णास फ्ल्यूूसारखी लक्षणे दिसल्यास पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये किंवा कोविड केअर केंद्रामध्ये पाठवावे. अशा रुग्णांना वेळेवर पाठवून दिल्यास त्यांची आवश्यकतेनुसार कोविड-19 साठी नमुने घेऊन निष्कर्षानुसार औषधोपचार करता येतील, असे आवाहन डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
नामवंत डॉक्टरांचे टास्क फोर्स
पुणे व पिंपरी-चिंचवड येथे करोनामुळे वाढत जाणाऱ्या मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्याबरोबर बाधितांवर तातडीने उपचार करण्यासाठी पुण्यातील 10 नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स (कार्य बल गट) स्थापन केल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली. टास्क फोर्समध्ये नऱ्हे येथील एसकेएन मेडिकल कॉलेज डॉ. दिलीप कदम, भारती विद्यापीठ डॉ. शिवा अय्यर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. भारत पुरंदरे, डॉ. प्रसाद राजहंस, रूबी हॉस्पिटल डॉ. कपील झिरपे, डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. अभय सदरे तसेच बी. जे. मेडिकल कॉलेजच्या डॉ. आरती किनीकर, डॉ. शितल धडफळे, डॉ. एस. ए. सांगळे यांचा समावेश आहे. तर पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग हे त्यांच्याशी समन्वय साधणार आहेत.