वॉशिंग्टन – अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी तडकाफडकी थांबवला आहे. गेल्या वर्षीै त्यांनी या संघटनेला चारशे दशलक्ष डॉलर्सची मदत केली होती. करोनाच्या बाबतीत या संघटनेने जी निष्काळजी आणि बेजबाबदारपणा दाखवला त्याची शिक्षा म्हणून अमेरिकेने त्यांचा हा निधी बंद केला आहे. ही संघटना चीनच्या दबावाखाली काम करते हा ट्रम्प यांचा त्यांच्यावरील आणखी एक राग होता.
तैवानने करोना व्हायरसबद्दल डिसेंबर महिन्यातच पत्र लिहून जागतिक आरोग्य संघटनेला सावध केले होते. पण त्यांनी त्याची दखल घेतली नाही. या विषयी चीनकडून सादर झालेल्या माहितीवरच ते अवलंबून राहिले आणि जगाला त्यांनी या विषाणूंच्या प्रसारासंबंधात कोणतीही माहिती दिली नाहीं किंवा जगाला त्यांनी सावध केले नाहीं. ही त्यांचीच जबाबदारी होती असे अमेरिकेचे म्हणणे होते. त्यामुळे या बेजबाबदारपणाबद्दल अमेरिकेने त्यांचा निधी थांबवला आहे.
दरम्यान अमेरिकेच्या या कृत्यावर संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेर्रेस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या सारे जग करोनाच्या आव्हानाशी मुकाबला करीत असताना आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेचा निधी कोणत्याही देशाने थांबवणे व्यवहार्य नाही असे त्यांनी म्हटले आहे.