मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचे म्हटले होते. त्यासाठी त्यांनी एक व्हिडीओदेखील या सभेत दाखवला होता. यावेळी त्यांनी हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईलने कारवाई करू असा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.आता गेल्या काही दिवसांपासून आपल्या विधानांबाबत चर्चेत असलेले कालिचरण महाराज यांनी राज ठाकरेंवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
कालिचरण महाराजांनी यावेळी शिंदे सरकारचे कौतुक देखील केले. शिंदे सरकारबाबत बोलताना कालिचरण म्हणाले,”शिंदे सरकार चांगली कामं करत आहे, हिंदू हिताची काम करत आहे” असं म्हणत त्यांनी शिंदे सरकारचे देखील अभिनंदन केले. तसेच यावेळी कालिचरण महाराजांनी राज ठाकरेंबाबत देखील भाष्य केले.
“अशा कामांमध्ये राज ठाकरे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अशीच कामं राज ठाकरे यांच्याकडून होत राहिली तर निःसंशयपणे त्यांची खूप प्रगती होईल. सर्व हिंदू त्यांच्या पाठिशी उभे राहतील” असं कालिचरण महाराज राज ठाकरेंबाबत म्हणाले आहेत. कालिचरण महाराज सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. रुपाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरेंबाबत प्रतिक्रिया दिली.
नामांतराबाबत देखील बोलले
औरंगाबादसारख्या शहराच्या नामांतराला सध्या विरोध होतोय याबाबत विचारले असता कालिचरण महाराज म्हणतात,“हाथी चले बाजार कुत्ते भौंके हजार, या नितीनुसार शिंदे सरकारने भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष न देता हिंदू हिताची कामं करत राहावी”