नवी दिल्ली – कर्नाटकात यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वात आधी कॉंग्रेसने आपल्या तयारीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये 124 नावांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक यांच्यासह कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नावांचा समावेश आहे.
पक्षाने कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांना कनकापुरा येथून उमेदवारी दिली आहे. तर वरुण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, यूटी अब्दुल कादर अली फरीद यांना मंगलोर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कोलार गोल्ड फिल्ड्समधून रूपकला एम या कॉंग्रेसच्या उमेदवार असतील.
याशिवाय दिनेश गुंडूराव हे बंगळुरूमधील गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. जमीर अहमद खान हे चामराजपेट मतदारसंघातून पक्षाचा चेहरा असतील. तर मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांना चितापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या आक्रमक प्रचाराला तोंड देण्यासाठी विजयाची सर्वाधिक खात्री असलेल्या उमेदवारांची पहिल्या यादीत नोंद असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.