पिंपरी, दि. 25 – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणीपट्टी थकबाकी वसुली मोहिम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईच्या माध्यमातून मागील चार दिवसांत 134 थकबाकीधारकांवर कारवाई करुन तब्बल 65 लाख रुपयांची थकीत पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे.
महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 20 ते 24 मार्च दरम्यान ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये एकूण 67 नळजोड तोडण्यात आले. त्यानुसार अ (15), ब (65), क (2), ड (12), इ (8), फ (12), ग (4) आणि ह (16) या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील एकूण 134 थकबाकीदारांकडून अनुक्रमे 65 लाख रुपये वसूल करण्यात आले.
प्रभाग उपअभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता, मीटर निरीक्षक, प्लंबर, मजूर आणि महाराष्ट्र सुरक्षा दल जवान यांच्या पथकाने सामुदायीकरित्या ही कारवाई केली आहे. पाणीपट्टी थकबाकी मोहिमेंतर्गत नळजोड तोडण्याची मोहिम थकबाकी वसुली होईपर्यंत आणखी तीव्र करण्यात येणार आहे. तरी, थकबाकीधारकांनी त्वरित सर्व थकबाकी मनपा प्रभाग कार्यालयातील कोषागारात रोखीने अथवा ऑनलाईन पध्दतीने पीसीएमसी लिंकद्वारे भरणा करावी, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.