बंगळुरू – काही दिवसांपूर्वीच छत्तीसगड येथील जिल्हाधिकारी अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडलेल्या एका तरुणाला रस्त्यावर कानशिलात लावतानाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करोना संकटामुळे जेरीस आलेल्या जनतेला प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुजोरीही सहन करावी लागत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटल्या.
अखेर जनतेच्या रेट्यापुढे जिल्हाधिकाऱ्यांना माफी मागावी लागली व राज्य सरकारला त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. हे प्रकरण ताजे असतानाच आता असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील असून यामध्ये बंगळुरू महापालिकेचे अधिकारी एका युवकाला मारहाण करताना दिसतायेत.
प्राप्त माहितीनुसार मारहाण करण्यात आलेला युवक हा करोनाप्रतिबंधक लस घेण्यासाठी माहापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सेंटरवर गेला होता. मात्र नंतर ही लसीकरणाची रांग नसून करोना चाचणीची रांग असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तेव्हा या युवकाने येथून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याला करोना चाचणी करून घे असा तगादा लावला. तरुणाने याला विरोध केल्यानंतर महापालिकेचे अधिकारी व त्याच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. नंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तरुणास जबरदस्तीने पकडण्याचा प्रयत्न केला. तरुण त्याला विरोध करू लागल्याने खवळलेल्या अधिकाऱ्यांनी त्याला येथेच्छ चोप दिला.
दरम्यान, या सर्व घटनेचे चित्रीकरण करू लागलेल्या एका अन्य तरुणाला देखील महापालिकेचा एक इतर कर्मचारी हटकत असून त्याच्याकडून मोबाईल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचेही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, या घटनेबाबत बंगळुरू महापालिकेच्या आयुक्तांनी खेद व्यक्त करताना, कोणालाही जबरदस्ती करून त्याची करोना चाचणी करणे चुकीचे असल्याचं म्हंटल. तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले.
याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.
#WATCH | In a viral video, a man was seen being assaulted by a BBMP booth level officer after he mistook a queue for #COVID19 testing to be that for vaccination. He was allegedly assaulted when he refused to undergo test. FIR registered under multiple sections of IPC. pic.twitter.com/v3ZybEYFLT
— ANI (@ANI) May 24, 2021