नवी दिल्ली – देशभरात कोविड 19 ची साथ असताना उपजीविकेची गंभीर समस्या निर्माण झाल्याने तृतीयपंथी समुदायाच्या लोकांवर या महामारीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे.
सद्यपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथी समुदायाच्या कल्याणासाठी सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने प्रत्येक तृतीयपंथी व्यक्तीला त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्वरित आधार म्हणून 1500 रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. ही आर्थिक मदत तृतीयपंथी समुदायाला त्यांच्या रोजच्या गरजा भागविण्यास मदत करेल. तृतीयपंथी व्यक्तींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि समुदाय आधारित संघटनांना या उपक्रमाविषयी जनजागृती करण्यास सांगितले गेले आहे.
या मदतीसाठी सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स या स्वायत्त संस्थेच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. यासंदर्भातील माहिती समाज माध्यमांवर प्रसारित केली जात आहे. गेल्या वर्षीही लॉकडाऊनदरम्यान मंत्रालयाने तृतीयपंथी व्यक्तींना अशीच आर्थिक मदत आणि शिधा सामान पुरविले होते.
मानसिक आरोग्य समस्येचा सामना करणाऱ्या लोकांना त्याविषयीच्या गैरसमजांमुळे मदत मिळविण्यास संकोच वाटत असल्याने मानसिक समर्थन आणि मानसिक आरोग्य सेवेसाठी सध्याच्या महामारीत पीडित तृतीयपंथी व्यक्तींसाठी एक विनामूल्य हेल्पलाइन सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने जाहीर केली आहे. कोणताही तृतीयपंथी व्यक्ती हेल्पलाइन क्रमांक 8882133897 वर तज्ज्ञांशी संपर्क साधू शकेल. त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी या हेल्पलाइनवर व्यावसायिक मानसशास्त्रज्ञ समुपदेशन केले जाईल.
तसेच लसीकरण केंद्रांमध्ये तृतीयपंथी व्यक्तींना लसीकरण करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.