पेठ -ग्रामीण भागातील तरुणांचा कल शॉर्ट फिल्म निर्मितीकडे वाढू लागला आहे. नोकरी, इतर व्यवसायांकडे न वळता तरुणवर्ग चित्रपट निर्मितीमध्ये उतरलेले दिसून येत आहेत.पेठ (ता. आंबेगाव) येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा उच्च शिक्षण घेतलेले तरुण नोकरीमध्ये मन न रमल्याने फोटोग्राफीच्या माध्यमातून शॉर्टफिल्म, चित्रपट निर्मितीकडे वळताना दिसू लागले आहेत. शेतकरी कुटुंबातील तरुणांमध्येही चित्रपट निर्मितीचे “फॅड’ निर्माण झाले आहे.
शार्ट फिल्मची संकल्पना घेऊन छोटे-मोठे व्हिडिओ बनविण्यात मग्न असताना दिसून येत आहेत. पेठमध्ये विशेषतः सौरंग्या डोंगराच्या पायथ्याशी ठाकरवस्ती येथे असलेल्या ग्रामीण वस्तीत स्थानिक कलाकारांना घेऊन चित्रीकरण करत असतात.
समाजला भेडसवणारे प्रश्न, बेरोजगारी, अनिष्ठ, प्रथा, व्यसनाधिनता यांसारख्या सामाजिक विषयांवर चित्रपट निर्मिती करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विषय घेऊन चित्रपट बनविण्यासाठी या भागातील तरुणांमध्ये वाढता रस असल्याचे दिसून येत आहे.