न्यूयॉर्क – भारताच्या बाहेरील जगातले पहिले योग विद्यापीठ अमेरिकेत स्थापन करण्यात आले असून त्याच्या कार्याला प्रारंभ झाला आहे. योगाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी, संशोधनासाठी आणि प्रसारासाठी हे विद्यापीठ कार्य करणार आहे.
लॉस एंजल्स येथे हे विद्यापीठ सुरू करण्यात आले असून त्याला विवेकानंद योग विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन काल भारताचे विदेश व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आणि विदेश मंत्रालयाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी यांच्या हस्ते झाले. प्रख्यात योगगुरू डॉ. एच. आर. नागेंद्र हे या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू आहेत.
ते म्हणाले की, हे विद्यापीठ म्हणजे पूर्व आणि पश्चिमेचा उत्तम समन्वय म्हणून कार्यरत राहील. यात पूर्वेकडील भारताच्या प्राचीन योग विद्येचा प्रसार केला जाईल आणि त्याला पश्चिमेच्या आधुनिक वैज्ञानिक संशोधनाची जोड दिली जाईल. जगाच्या आरोग्यावर एकात्मिक उपचार पद्धती सुरू करून त्याचा व्यापक प्रसार करण्याचा आमचा इरादा आहे, असेही नागेंद्र यांनी यावेळी सांगितले.