होम मिनिस्टर-खेळ रंगला पैठणी कार्यक्रमास प्रतिसाद
कोपरगाव – महिला आणि महिलांचे प्रश्न हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जनतेच्या पाठिंब्यामुळे कोट्यवधीची अनेक विकास कामे केली. गोरगरिबांचे अश्रू पुसले.राजकारणात काम करताना अनेक अडचणी येतात; पण त्यावर मात करत नि:स्वार्थी भावनेने जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरूच आहे. महिला सक्षमीकरण व समाजासाठी माझे आयुष्य वाहून घेतले. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हे कार्य अखंड सुरूच राहील, अशी भावनीक साद माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी घातली.
संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटातर्फे शनिवारी कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या मैदानात अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर-खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोपरगावात पहिल्यांदाच झालेल्या या सोहळ्याला उदंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांच्या जीवनकार्यावर व त्यांनी केलेल्या विकास कामांवर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी कलावतीताई कोल्हे, सरिताताई देशमुख, मनालीताई कोल्हे, रेणुकाताई कोल्हे, श्रद्धाताई कोल्हे, कोल्हे कुटुंबीय आदींसह सर्व वयोगटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. क्रांती नाना मळेगावकर यांचे खुमासदार निवेदन व सूत्रसंचालन, गप्पा-गोष्टी, उखाणे, चित्रपट गीते, लावणी, लोकगीते, भक्तिगीते, प्रश्नोत्तरे, नृत्य, फुगा फोडणे, तळ्यात मळ्यात व इतर विविध मनोरंजक खेळ यामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर चांगलाच रंगत गेला. महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. स्वत: स्नेहलताताई कोल्हे यांनी महिलांसोबत जवा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्यावर ठेका धरला.
कोल्हे म्हणाल्या,महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास जागृत केला. महिलांना बचतीची सवय लावून त्यांना बॅंक व्यवहाराची माहिती करून दिली. उंबऱ्याच्या आत अडकलेल्या माता-भगिनींना घराबाहेर काढून आर्थिक चौकटी मोडून समाजाच्या प्रवाहात आणले. महिला बचत गट चळवळीच्या माध्यमातून महिलांचे अनेक प्रश्न सोडविले. आपल्याला रडायचे नाही तर लढायचे आहे’, असा संदेश देत स्त्रीशक्तीचा जागर केला. एकीचे बळ फार मोठे आहे. स्त्री हे शक्तीचे रूप आहे. कोणतीही महिला अबला नाही. मीच राणी लक्ष्मीबाई, मीच जिजाऊ, मीच सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी संघटित होऊन आत्मविश्वासाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महिलांना बक्षीसांचे वाटप
कार्यक्रमस्थळी लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यातील भाग्यवान विजेत्या महिलांना स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते पहिले बक्षीस फ्रीज, दुसरे बक्षीस वॉशिंग मशीन, तिसरे बक्षीस मायक्रो ओव्हन, चौथे बक्षीस एलईडी टीव्ही, पाचवे बक्षीस मिक्सर तसेच 11 पैठणी व 131 आकर्षक बक्षीसे देण्यात आली.