पिंपरी – ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना अभय देत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या पोलीस अधिकाऱ्यांची कुंडली काढण्याचे काम सुरू आहे. येत्या जनरल बदल्यांमध्ये अशा अधिकाऱ्यांची साईड ब्रॅन्चला बदली केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. सामाजिक सुरक्षा विभागातील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर दै. “प्रभात’ने 26 मार्च रोजी “पोलीस आयुक्तांकडून चोर सोडून संन्याशाला फाशी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्तांनी अशा अधिकाऱ्यांवर पूर्ण लक्ष असल्याचे सांगितले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केल्यापासून आत्तापर्यंत 175 हून अधिक कारवाई केल्या आहेत. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत या कारवाया केल्या आहेत त्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. मात्र पोलीस निरीक्षकांनी केल्या तक्रारीवरून पोलीस आयुक्तांनी सामाजिक सुरक्षा विभागातील सात कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली.
याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना विचारले असता ते म्हणाले की, सामाजिक सुरक्षा विभाग नवनवीन कारवाया करीत आहेत. त्यापैकी बहुतांश अवैध धंद्याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनाही माहिती नव्हती. मात्र मटका, जुगार, स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसाय या अवैध धंद्याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती असणारच आहे.
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारच्या कारवाया झाल्या आहेत, त्यांची वेगळी नोंद केली जात आहे. काही प्रकरणांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकास खुलासा विचारण्यात आला आहे. समाधानकारक खुलासा न आल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची कार्यक्षम नसल्याचे त्यांची बदली केली जाणार आहे.
सामाजिक सुरक्षा पथकात आयुक्तांचे हेर?
सामाजिक सुरक्षा पथकामध्ये आयुक्तांची खास माणसे आहेत. ही माणसे कारवाई दरम्यान कोणी गडबड करीत नाही ना, किंवा सामाजिक सुरक्षा पथकाच्या नावाखाली कोणी वसुली करीत नाही ना, याबाबतचा गोपनीय अहवाल पोलीस आयुक्तांना देत असतात. याच माहितीच्या आधारे सात कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागी पाठविण्यात आल्याचे पोलीस आयुक्त यांनी सांगितले.