प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 -फिरत्या हौदात केवळ 13 टक्केच मूर्ती विसर्जन करण्यात आल्याने, दीड कोटी रुपयांचे अक्षरश: विसर्जन झाल्याचा आरोप “सजग नागरिक मंच’चे विवेक वेलणकर यांनी केला आहे.
महापालिकेने गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी तसेच घाटांवर 46 बांधलेले हौद, 359 लोखंडी टाक्या, 191 मूर्ती संकलन / दान केंद्रे अशी व्यवस्था केली होती आणि ती 2019 पर्यंत पुरेशी ठरत होती. तरीही या वर्षीच्या गणेशोत्सवात पुणे महापालिका आयुक्त आणि प्रशासन यांच्या अनाकलनीय अट्टाहासाने गणेश विसर्जनासाठी दीडशे फिरते हौद घेतले.
सन 2020 आणि 2021 मध्ये लॉकडाऊनमुळे या विसर्जन व्यवस्था उपलब्ध नव्हत्या. म्हणून महापालिकेने 60 फिरते विसर्जन हौद संपूर्ण शहरासाठी भाड्याने घेतले. यंदा लॉकडाऊन नसल्याने लोखंडी टाक्यापासून मूर्ती संकलनपर्यंत सर्व नियमित गणेश विसर्जन पर्याय उपलब्ध होते. तरीही पुणे महापालिका आयुक्त आणि प्रशासन यांच्या अनाकलनीय अट्टाहासाने गणेश विसर्जनासाठी दीडशे फिरते हौद महापालिकेने घेतल्याचा आरोप वेलणकर यांनी केला आहे.
दि. 22 ऑगस्ट रोजी फिरत्या हौदांचे टेंडर निघाले तेव्हा, याची गरज नसून हा खर्च पाण्यात जाणार आहे, असे आम्ही सांगितले होते; ते खरे ठरल्याचे पुणे महापालिकेने स्वतःच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट होते आहे. एकूण विसर्जनासाठी आलेल्या 4 लाख 30 हजार 91 पैकी जेमतेम 13 टक्के मूर्तींचे विसर्जन या फिरत्या हौदात झाले. याचाच अर्थ आयुक्तांच्या अट्टाहासामुळे नागरिकांच्या कराचे जवळपास दीड कोटी रुपये पाण्यात गेल्याचे वेलणकर यांचे म्हणणे आहे.
प्रामाणिकपणे मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांची गेले पन्नास वर्षे उपलब्ध असलेली 40 टक्के सवलत बिनदिक्कतपणे काढून घेण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आयुक्तांची ही स्वतःच्या अट्टाहासापोटी नागरिकांच्या कराच्या पैशाचे विसर्जन करण्याचा निर्णय अत्यंत संतापजनक आहे. आता हे पैसे महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल झाले पाहिजेत, अशी मागणी लावून धरली पाहिजे, असे वेलणकर यांचे म्हणणे आहे.