पॅरिस – भारतासारख्या अनेक देशांमध्ये पेन्शनधारकाला आपण हयात असल्याचा दाखला दरवर्षी सादर करावा लागतो. त्यानंतरच त्याची पेन्शन सुरू राहते; पण फ्रान्समधील एका महिलेला मात्र ती पेन्शनर नसतानाही आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे. एका खटल्यामध्ये चुकून न्यायालयाने तिला मृत घोषित केले असल्यामुळे तिचे अस्तित्वच संपले आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तिला आपण जिवंत असल्याचे दाखवून द्यावे लागत आहे.
जिन पोचेन असे 58 वर्षीय महिलेचे नाव असून 2017 मध्ये एका खटल्यामध्ये न्यायालयाने तिला चुकून मृत घोषित केले होते. सरकार दरबारी आणि अधिकृत कागदपत्रांमध्ये तिची नोंद मृत अशीच असल्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना तिला अनेक अडचणी येत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तिने घेतलेल्या कर्जांचे हप्तेही ती आता फेडू शकत नाही; कारण ती अधिकृतरित्या मृत आहे. तिने कर्जावर घेतलेले काही फर्निचर बॅंकांनी जप्त करून परत नेले आहे.
या महिलेचा कायदेशीर वारस म्हणून तिचा पती आणि मुलगा आहे. त्यांच्या सगळ्यांच्या नावावर एक जॉइंट अकाउंट आहे पण ते जॉईंट अकाउंट ऑपरेट करणे सुद्धा या कुटुंबाला शक्य होत नाही. कायद्याच्या दृष्टिकोनातून आणि समाजाच्या दृष्टिकोनातून माझे अस्तित्वच राहिलेले नाही. मी कोणतेही व्यवहार करू शकत नाही. व्हरांड्यात बसून राहणे याशिवाय मी करू शकत नाही, असे तिने म्हटले आहे. गेले तीन वर्ष जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी ही महिला आणि तिचा पती मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत; पण जोपर्यंत ह्या प्रयत्नात यश मिळत नाही तोपर्यंत या महिलेचा सामाजिक स्टेटस हा मृत असाच राहणार आहे.