नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढील महिन्याच्या अखेरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ते अधिवेशन 29 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत होऊ शकते.
करोना संकटामुळे मागील वर्षी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्यात आले नाही. मात्र, यावेळी नोव्हेंबरच्या अखेरीस हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होण्याची शक्यता संसदीय सुत्रांनी व्यक्त केली.
त्या अधिवेशनात सर्व करोनाविषयक नियमांचे पालन केले जाईल. उत्तरप्रदेश, पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या निवडणुकांच्या काही दिवस आधी होणारे संसदेचे अधिवेशन राजकीयदृष्ट्या महत्वाचे ठरणार आहे.
अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून मोदी सरकार आणि भाजपला घेरण्याची संधी विरोधकांना मिळेल. त्यामुळे आगामी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.