पिंपरी – आठही मुलीच झाल्याने पती छळ करीत होता. तसेच त्याने दुसरे लग्न करण्याची तयारीही केली होती. यामुळे संतापलेल्या पत्नीने आपल्या पतीवर विषप्रयोगाचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर पतीचा खून करण्यासाठी दोन लाखांची सुपारीही दिली. सराईत गुन्हेगारांनी पतीवर खुनी हल्ला केल्यावर अवघ्या आठ तासांत निगडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकत गुन्हा उघडकीस आणला.
शिवम दुबे ऊर्फ दुब्या आणि अमन पुजारी (दोघेही रा. पंचतारानगर, आकुर्डी) आणि जखमीची पत्नी अशी गुन्हा दाखल करून अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत जखमीच्या मुलीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेला आठ मुलीच झाल्या. या कारणावरून तिचा पत छळ करीत होता. तसेच त्याने दुसरे लग्न करण्याची तयारीही केली होती. यामुळे पत्नीने त्याचा काटा काढण्याचे ठरविले. सुरवातीला तिने पतीवर विषप्रयोग करण्याचे ठरविले. मात्र पती सावध असल्याने वेळोवेळी तिचा हा प्रयोग फसला.
त्यानंतर तिने शेजारी राहणारा सराईत गुन्हेगार अमन पुजारी याला दोन लाख रुपयांची सुपारी दिली. या कामासाठी त्याने आपला मित्र शिवम दुबे याला सोबत घेतले. सुपारी मिळालेल्या पैशातून त्यांनी तलवारीही खरेदी केल्या. ७ डिसेंबर रोजी रात्री पती दारू पिऊन झोपल्याचे पत्नीने आरोपींना सांगितले. त्यानंतर घरात घुसून आरोपींनी पतीवर तलवारीने सपासप वार केले. मृत झाल्याचे समजून आरोपी तेथून निघून गेले.
निगडी पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांनी आरोपी अमन याला ओळखले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता जखमी व्यक्तीच्या पत्नीनेच सुपारी दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पत्नीला अटक केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.