भोपाळ – दिवंगत अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली होती. माध्यमांमध्ये ही घटने अनेक दिवस चर्चेचा विषय ठरली होती. त्याचवेळी भैय्यू महाराजांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा निष्कर्षही काढण्यात आला होता. आता त्यांच्या आत्महत्येमागे मोठं षडयंत्र असल्याचं समोर आलं आहे.
भैय्यू महाराज यांना पलक पुराणिक नावाची तरुणी अश्लील व्हिडीओ सोसल मीडियावर शेअर करण्याची धमकी देऊन वारंवार त्रास द्यायची. यामध्ये आश्रमातील दोन सेवकही पलकला मदत करायचे. तिच्या त्रासाला कंटाळून भैय्यू महाराजांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती उघड झाली आहे.
याप्रकरणी भोपाळच्या फॉरेन्सिक टीमने शुक्रवारी न्यायालयात 109 पानी व्हाट्सअॅप चॅटींग सादर केलं आहे. त्यामध्ये अनेक तथ्य असल्याचा दावा करण्यात येतोय. यामध्ये पलक एका व्यक्तीशी चॅट करत असून त्याच नाव पियूष जीजू असं आहे. पलक हिला आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे.
चॅटमध्ये आरोपी पलकने ‘BM ला अर्थात भैय्यू महाराजांना वेडं करण्यासाठी घरी बसवायचं आहे. त्यासाठी मांत्रिकासोबत 25 लाखांचं डीलदेखील झालं’, असा उल्लेख केला आहे. पलकने भैय्यू महाराजांवर लग्नासाठी देखील दबाव केला होता. मात्र भैय्यू महाराजांनी आयुषी यांच्याशी लग्न केलं होतं. चॅटमध्ये आयुषी आणि मुलगी कुहूचा देखील उल्लेख आहे.
भैय्यू महाराज यांनी 12 जून 2018 मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे दोन्ही सेवक शरद देशमुख आणि विनायक दुधाले यांना अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पलक, विनायक आणि शरद तिघे मिळून भैय्यू महाराजांची संपत्ती हडपण्याच्या प्रयत्नात होते.