मढी विश्वस्तांचा आरोप, अध्यक्ष संजय मरकड यांच्या मनमानीपणाचा वाचला पाढा
पाथर्डी – श्री क्षेत्र मढी येथील देवस्थान ट्रस्टच्या मंडळातील वादामध्ये आमदार मोनिका राजळे यांचा कोणत्याच प्रकारचा संबंध नसून त्यांना बदनाम करण्याचा राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मढी देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी केला आहे. पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर देवस्थान समितीचे विश्वस्त यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार राजळे यांच्यावर झालेल्या आरोपाचे खंडन करत संजय मरकड यांनीच पूर्ण नियोजित कटकारस्थान करून वादाला सुरुवात केल्याचा आरोप विश्वस्तांनी केला. विश्वस्त मंडळींनी अनेक गंभीर आरोप संजय मरकड यांच्यावर केले.
शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेसाठी विश्वस्त राधाकिसन मरकड, रवींद्र आरोळे ,नवनाथ मरकड, शामराव मरकड, भगवान मरकड, भाऊसाहेब मरकड, जनार्दन मरकड, चंद्रभान पाखरे आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना विश्वस्त म्हणाले, आमदार राजळे यांच्या घरी या हल्ल्यासाठी मीटिंग झाली आणि त्या ठिकाणी कट रचला गेला, असे बिन बुडाचे खोटे आरोप स्वतः अध्यक्ष म्हणून घेणारे संजय मरकड हे करीत असून कोणत्याही विश्वस्तांची मीटिंग आजपर्यंत आमदार राजळे यांच्या घरी झालेली नाही. आम्हाला कोणीही आदेश दिले नाही. १४ डिसेंबर गुरुवारच्या दिवशी आमची मासिक बैठक आयोजित केली होती. त्यात विश्वस्तांच्या बहुमताने जो निर्णय होईल ते मान्य केले जातात, अशा पद्धतीचा कायदा या ट्रस्टच्या घटनेच्या तरतुदीमध्ये केला गेला आहे.
बैठक उधळून लावायची यासाठी बैठक सुरू होण्यापूर्वी दहा ते वीस गुंड गडावर संजय मरकड यांने गोळा करून ठेवले . हे भक्त आहे की गुंड याचा आम्हाला अंदाज आला नाही. आम्ही आयोजित केलेली बैठक या गुंडासह संजय मरकडे याने हाणून पाडली. आम्हाला मारहाण करून पवित्र अशा देवस्थान ट्रस्टला गालबोट लावून याला वेगळे राजकीय वळण दिले. अशा प्रवृत्तीपासून देवस्थान व गावचा विकास यावर मोठा परिणाम झालेला आहे. सर्व रखडलेले विकास कामे, देवस्थानचे दैनंदिन आर्थिक खर्चाचा व्यवहार पूर्ण पदावर आणण्यासाठी अकरा पैकी दहा विश्वस्त प्रयत्नशील आहेत.
संजय मरकड हा स्वतःला देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून घेत, त्यांनी बहुमतातील निर्णय होऊ नये म्हणून ही मासिक बैठक उधळून लावायची म्हणून हा कट आधीच शिजवून ठेवला होता. यापूर्वी विश्वस्तांच्या सर्वानुमते देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष पदावरून संजय मरकड याला बहुमताच्या निर्णयावरून कमी केले होते. बहुमताचे निर्णय होऊ द्यायचे नाही. मी सांगेल तेच खरे आहे. चुकीचं असलं तरी तो निर्णय बळजबरी लादण्याचे काम सुरू होते. अशा वाईट प्रवृत्तीला आमचा विरोध असून गावकरी ,भक्त या हेकेखोरपणाच्या व्यक्ती विरोध प्रचंड चीड असून ग्रामस्थ व भाविक भक्तामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
येणाऱ्या काळात पुन्हा एकदा विश्वस्त मंडळाची बैठक घेऊन देवस्थानचा कारभार पूर्ण पदावर आणू, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. वादाची घटना देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. यामध्ये दहा विश्वस्तांचा कुठलाही चुकीचा प्रकार झाला नसून संजय मरकड यांच्याकडून बैठकीमध्ये येऊन गोंधळ घालत मारहाण करण्यास सुरुवात केली आहे. हे त्या सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होत आहे.
आमदारांना अडचणीत आणण्याचे काम
मढी देवस्थान व गावच्या कारभारात आमदार राजळे या कधी हस्तक्षेप करीत नाही. उलट त्यांनी विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. अनेक विकासकामे सुरू असल्याने विरोधकांना कुठेतरी जलोषी वृत्ती निर्माण होऊन स्वतःच असे वाद निर्माण करून त्यामध्ये आमदारांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याची वाईट प्रवृत्ती आहे. संजय मरकड यांना भाजपचे पद दिले होते. मात्र, त्यावरती स्थगिती आली होती. त्याचे राजकारण करून कुठेतरी सूड उगवण्यासाठी असे घाणेरडे आरोप संजय मरकड हे करीत आहे. आमदारांचे सुरू असलेले चांगले काम यांना खपत नाही. कुठेतरी त्यांना अडचणीत आणण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे.
मनमानी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती
देवस्थान समितीच्या त्या कर्मचाऱ्याला मासिक पगार सहा हजार रुपये, झाडे जळाली म्हणून त्याला चौदा हजार रुपये आर्थिक दंड याच अध्यक्षांनी केला होता. सात ते आठ कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन काढून टाकले मात्र न्यायालयाने त्यांना पुन्हा कामावर घेतले. विश्वस्तांना विश्वासात न घेता कारण नसताना गडावर कर्मचाऱ्यांची भरती केली
मरकड यांच्यावरील गु्न्हा सिद्ध
काही महिन्यांपूर्वी संजय मरकड यांच्यावर गुन्हा सिद्ध होऊन त्यांनी दंड भरला होता. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एखाद्या विश्वस्ताच्या संदर्भात दंड किंवा गुन्हा सिद्ध झाला तर मढी देवस्थान ट्रस्टच्या घटनेच्या तरतुदीनुसार त्या विश्वस्त मंडळातील व्यक्तीला कोणत्याच पदावर राहता येत नाह. त्याला काढून टाकण्यात येते. या मुद्द्यावरून संजय मरकड यांना अध्यक्ष पदावरून मागच्या बैठकीत हटवले गेले.