बंधाऱ्याची पाहणी आणि जलपूजनप्रसंगी डॉ. मीना पटेल यांचे प्रतिपादन
जुन्नर -जुन्नर तालुक्याच्या पश्चिम दुर्गम भागातील घाटघरच्या ब्रिटिशकालीन फडके बंधाऱ्याच्या खोलीकरणामूळे परिसरातील ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटला असून परिसरातील पाण्याची पातळीही उंचावल्याचे प्रतिपादन ओहायोच्या (अमेरिका) पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मीना पटेल यांनी केले.
टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि रोटरी इंटरनॅशनल ग्रॅंटच्या सहाय्याने रोटरी क्लब ऑफ पुणे फार इस्ट, युनिव्हर्सिटी, पुणे सिटी, स्प्रिंगडेल यांनी केलेल्या या खोलीकरणाच्या पाहणीसाठी त्या शनिवारी (दि. 18) घाटघर येथे आल्या होत्या. हा बंधारा बांधल्यापासून अद्याप येथील गाळ काढला नसल्याने येथे पावसाचे पाणी साठत नव्हते. सुमारे 12 लाख रुपयांचा निधी खर्च झालेल्या या खोलीकरणाच्या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे रोटरी क्लब ऑफ पुणे फार इस्टचे पंकज पटेल यांनी सांगितले.
दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान हा बंधारा रिकामा होत होता, मात्र साठवण क्षमता वाढल्यामुळे यंदा या बंधाऱ्यात मे महिनाअखेर पाणी उपलब्ध होणार असल्याचे रोटरी इंटरनॅशनल आशियाचे (दिल्ली) वरिष्ठ व्यवस्थापक अश्विनी शर्मा यांनी सांगितले. पुण्यातील विविध रोटरी क्लबने जुन्नर तालुक्यात अनेक सामाजिक कामे उभारली असून, जुन्नर रोटरी क्लबचे सहकार्य उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले. सध्या घाटघर ग्रामस्थांना हापशी पंपाद्वारे पाणी मिळत आहे.
या बंधाऱ्याजवळ विहीर खोदून जलवाहिन्यांद्वारे गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी याप्रसंगी ग्रामस्थांनी केली आहे. या बंधाऱ्याच्या खोलीकरणप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी याठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी या बंधाऱ्यांची उंची वाढवून देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन खासदारांनी दिल्याचे माजी सरपंच चंदर शिंगाडे यांनी सांगितले. याप्रसंगी जलपूजन व नामफलकाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी डॉ. इंद्रदेव पटेल (अमेरिका), रोटरी जुन्नरचे माजी अध्यक्ष भरत चिलप, हितेंद्र गांधी, माजी सरपंच चंदर शिंगाडे, चिंधा घोइरत, सुरेश रावते, मारुती साबळे, गणू डामसे, नाथा पानसरे, शैला रावते व ग्रामस्थ उपस्थित होते.