मतदारनोंदणीची प्रक्रिया 4 ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार

मुंबई (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघा महिना उरला आहे. यादरम्यानच्या काळात बेकायदा मद्याची वाहतूक व विक्री व मतदारांना इतर प्रलोभने दाखवली जाणार नाही याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी इन्कम टॅक्‍स, एक्‍साईज विभागाची दक्षता पथके नेमण्यात आली आहेत. त्याशिवाय बॅंकांमधून होणा-या मोठ्या रक्कमांच्या व्यवहारावरही निवडणूक अधिकारी वाच ठेवणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली.

शनिवारी, दिल्लीत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर बलदेव सिंह यांनीही मंत्रालयात पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांच्या दृष्टीने पूर्वतयारी झाल्याची माहिती दिली. राज्यातील मतदारनोंदणीची प्रक्रिया निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे 4 ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी नोंदणी करणा-यांना निवडणुकीत मतदान करता येईल. त्यामुळे ज्यांची नोंदणी झालेली नसेल अशा व्यक्‍तींनी आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन बलदेव सिंह यांनी केले.

31 ऑगस्ट 2019 पर्यंत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदार आहेत.2014 च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये 59 लाख 17 हजार 901 इतकी वाढ झाली आहे. 2014 साली 90.43 टक्‍के मतदारांकडे व्होटर आयडी होते.हे प्रमाण 2019 मध्ये 96.81 टक्‍के इतके झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीची प्रक्रीया सुरळात पार पाडण्यासाठी 6 लाख 50 हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी व तक्रारींसाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक आहे. राज्यस्तरावर चोवीस तास हा टोल फ्री क्रमांक सुरु राहिल. विधानसभा निवडणुकीच्य काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस व केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.

ईव्हीएमच्या जनजागृतीचा कार्यक्रम यशस्वी

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसघांमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे.त्यासाठी राज्यात एकूण 1.80 लाख बॅलट युनिट,1.30 लाख कंट्रोल युनिट तर 1.35 लाख व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रणेची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. व्हीव्हीपॅटचा वापर संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच होणार असल्याने मतदारांच्या मनात जागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. जनतेनेही मोठया प्रमाणात यात सक्रिय सहभाग घेतला आहे. मतदानयंत्रांचा स्ट्रॉंगरूमध्ये साठा करण्यात आल्याचेही बलदेवसिंह म्हणाले.

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रे- 96 हजार 654

2014च्या तुलनेत यंदा मतदानकेंद्राच्या संख्येत 5 हजार 325 नी वाढ झाली
-2014च्या तुलनेत मतदारांच्या संख्येत 59 लाख 17 हजार 901 इतकी वाढ झाली आहे.

महिला मतदारांची संख्या वाढली

2011च्या जनगणनेनुसार 1 हजार पुरुशांच्या मागे 925 महिला असे प्रमाण होते. तर 2014मध्ये एक हजार पुरुषांच्या मागे 889 महिला असे प्रमाण होते. आता 2019मध्ये महिलांच्या संख्येत वाढ झाली असून एक हजार पुरुषांच्या मागे 914 असे प्रमाण आहे.

निवडणूक आयोगाचे घोषवाक्‍य

दिव्यांग मतदारांचा सहभागा वाढावा म्हणून यंदा सुलभ निवडणुका हे घोषवाक्‍य जाहिर केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र तळमजल्यावर आणली आहेत. लोकसभा निवडणुकीत 5 हजारांपेक्षा अधिक मतदान केंद्र पहिल्या व दुस-या मजल्यावर होती. विधानसभा निवडणुकीसाठी ही सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर आणली आहेत. त्यामुळे दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.