आबासाहेब अटकळेचा संघर्षपूर्ण विजय

पुणे – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा टाऊनशीपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला म्हाळुंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल येथे सुरुवात झाली. 57 किलो वजनी गटात माती विभागात आबासाहेब अटकळे याने उपांत्य फेरीत बीडच्या अतिश तोडकर वर विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. यावेळी अंतिम फेरीसाठी आबासाहेब अटकळे व संतोष हिरगुडे यांच्यामध्ये 8-8 अशी बरोबरी झाली. यावेळी आबासाहेबने शेवटचा गुण मिळविल्यामुळे त्याला विजयी घोषित करण्यात आले. हे दोघेही काका पवार यांच्या कात्रज येथील तालमीचे मल्ल आहेत.

तर 79 किलो गादी गटात रामचंद्र कांबळे (सोलापूर) याने कोल्हापूर शहराच्या निलेश पवार वरती 13 विरुद्ध 4 गुण फरकाने विजय मिळवित अंतिम फेरीत धडक मारली. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत उस्मानाबादच्या रवींद्र खरे याने श्रीधर मुळे (सातारा) याच्यावरती 4 विरुद्ध 1 अशा गुण फरकाने अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेचे औपचारिक उद्‌घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवडीचे उपसंचालक आनंद व्यंकेश्‍वर, हिंद केसरी अमोल बुचडे, परिषदेचे कार्यालयीन अधिकारी ललित लांडगे, परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे सहसचिव चंद्रशेखर शिंदे, भाऊसाहेब भोईर, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार आदी उपस्थित होते. आज 57 व 79 किलो वजनी गटातील माती विभागातील अंतिम फेरीचे सामने पार पडले यात 79 वजनी गटात माती विभागात उस्मानाबादच्या हणमंत पुरीने सोलापूरच्या सागर चौगुलेला 5-0 गुणाने हरवत सुवर्णपदक पटकावले. तसेच रजतपदकासाठी झालेल्या लढतीत नाशिकच्या धर्मा शिंदे याने परभणीच्या गिरिधारी दुबे याच्यावर 8-2 अशी मात केली.

ऑलिम्पिक दर्जाची पदके
या स्पर्धेसाठी ऑलिम्पिक दर्जाची पदके तयार करण्यात आली आहेत. 450 ग्रॅमची सुवर्ण, रजत व ब्रॉंझपदके बनवण्यात आली आहेत. स्पर्धेत एकूण 20 सुवर्ण, 20 रजत व गादी (मॅट) विभागासाठी 40 तर माती विभागासाठी 30 ब्रॉंझपदके तयार करण्यात आली आहेत.

आखाडा लक्षवेधी
या स्पर्धेसाठी अत्याधुनिक आखाडे तयार करण्यात आले आहेत. लिंबू, हळद, कापूर, ताक, तेल आदींचा वापर करण्यात आला आहे. खेळाडूंना सामन्यादरम्यान जखमा झाल्या तरीही त्यांना आखाड्यातील मातीतील या घटकांमुळे कोणताही संसर्ग होणार नाही. मातीवरील कुस्तीसाठी 2 आणि मॅटवरील (गादी) कुस्तीसाठी 2 आखाडे तयार करण्यात आले आहेत. मावळ व मुळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची 40 ब्रास माती आणून 20-20 ब्रासचे दोन आखाडे तयार करण्यात आले आहेत. या मातीत 1000 लिंबू, 250 किलो हळद, 50 किलो कापूर, रोज 100 लिटर ताक आणि 60 लिटर तेल घालून मातीचे आखडे तयार झाले आहेत.

अंतिम निकाल –
79 किलो माती विभाग, सुवर्ण- हणमंत पुरी (उस्मानाबाद), रजत – सागर चौगुले (सोलापूर जिल्हा ), ब्रॉंझ – धर्मा शिंदे (नाशिक), 57 किलो वजनी गट माती विभाग, सुवर्ण – आबासाहेब अटकळे (सोलापूर जिल्हा), रजत – संतोष हिरुगडे (कोल्हापूर शहर), ब्रॉंझ – ओंकार लाड(नाशिक )

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.