वाघोली(प्रतिनिधी) : शिरूर-हवेलीचे अॅड. आमदार अशोक पवार यांनी पूर्व हवेलीतील नागरिकांची महसुलाची कामे वेळेत मार्गी लागावी यासाठी वाघोली येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण करावे अशी मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अप्पर मुख्य सचिव महसूल विभाग व विभागीय आयुक्त यांचेकडे सातत्याने केली होती. आमदार पवार यांच्या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्याने अप्पर तहसील कार्यालयाबाबत सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आमदार पवार यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
हवेली तहसील कार्यालयाचे विभाजन करून पूर्व भागातील चार मंडलविभागासाठी वाघोली येथे नविन अप्पर तहसील कार्यालय सुरू करावे. तसेच या कार्यालयाकरीता एक स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी वर्ग यांची नेमणूक करावी अशी मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधित विभागाकडे शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी २७ फेब्रुवारी २०२० रोजी केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्पर तहसील कार्यालयाबाबत संबधित विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार संबधित विभागाच्या वतीने वाघोली येथील जागेची पाहणी करून प्रस्ताव पाठवण्यात आला होता. प्रस्ताव पाठवल्यानंतर वाघोली येथे नव्याने अप्पर तहसील कार्यालयासाठी हालचालींना सुरवात झाली होती.
याच अनुषंगाने हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, मंडलाधिकारी किशोर शिंगोटे यांनी वाघोलीच्या सरपंच वसुंधरा शिवदास उबाळे, शिवदास उबाळे यांच्या उपस्थितीत नविन अप्पर तहसील कार्यालयासाठी वाघोली येथील शासकीय गट नं ११२३ मधील जागेची पाहणी सुद्धा केली होती. अप्पर तहसील कार्यालामध्ये एक अप्पर तहसील अधिकाऱ्यांसह १३ पदे मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पवार यांनी दिली होती. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी अनुष्का दळवी यांनी विभागीय आयुक्त पुणे यांना पत्र देखील काढले होते.
आमदार अशोक पवार यांनी सातत्याने मागणी लावून धरली होती. दि. २४ मे २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा पत्र देऊन अप्पर तहसील कार्यालयाला मान्यता देऊन लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार अशोक पवार यांनी अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्याबरोबरच जागा, अधिकारी व कर्मचारीवर्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. आमदार पवार यांच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्याने तहसील कर्यालय निर्माण करण्याबाबत ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे नव्याने तहसील कार्यालय सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
पूर्व हवेलीसाठी वाघोली येथे अप्पर तहसील कार्यालय सुरु झाल्यास नागरिकांची धावपळ थांबेल. महसूल संबधित कामे प्रलंबित राहणार नाहीत. त्यामुळे नागरिकांची आर्थिक बचत होईल व वेळ वाया जाणार नाही.
– राजेंद्र सातव पाटील (माजी उपसरपंच,वाघोली)
वडगावशेरी मतदार संघातील कळस, हवेली मतदार संघातील वाघोली, थेऊर, उरळीकांचन या महसूल मंडलमधील ५५ गावे असून लोकसंख्या पाहता जवळपास २० लाखांच्या आसपास आहे. हवेलीची लोकसंख्या बघता हवेली तहसील कार्यालयावर कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या कामाला विलंब होत आहे. पूर्व हवेली अप्पर तहसील कार्यालय झाल्यास नागरिकांचे कामे वेळेत मार्गी लागणार असून आर्थिक व वेळेची बचत होणार आहे. पूर्व हवेली अप्पर कार्यालयात वाघोली, कळस, थेऊर व उरळीकांचन या चार मंडल कार्यालयांचा समावेश होणार आहे.