लॉस एंजेल्स – अमेरिकन चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार असलेला एमजीएम स्टुडिओ ऍमेझॉनने ताब्यात घेतला असून हा व्यवहार 61 हजार पाचशे कोटी रुपयांना झाल्याचे समोर आले आहे.
ऍमेझॉन आणि मेट्रो गोल्डविन मेयर म्हणजेच एमजीएम यांच्यामध्ये याबाबतचा करार झाला आहे. अमेरिकेतील नियामक संस्थांनी मंजुरी दिली की हा करार प्रत्यक्षात येऊ शकेल. एमजीएम स्टुडिओकडे जेम्स बॉण्डच्या सर्व चित्रपटांचे हक्क असल्याने आता हा स्टुडिओ ताब्यात आल्याने ऍमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर जेम्स बॉण्डचे सर्व चित्रपट पाहता येणार आहेत.
एमजीएम या प्रख्यात स्टुडिओची स्थापना 17 एप्रिल 1924 रोजी मार्कस लुईस आणि लुईस मेयर या दोघांनी केली होती. जगातील मनोरंजन क्षेत्राच्या दुनियेमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढत असल्याने ऍमेझॉन आणि एमजीएम या दोन कंपन्यांमधील करार हा अतिशय महत्त्वाचा मानण्यात येत आहे.
एमजीएम स्टुडिओ ताब्यात यावा यासाठी ऍपल आणि कॉमकॉस्ट या कंपन्यांनीही प्रयत्न केले होते पण ऍमेझॉनने या कंपन्यांनी दिलेल्या प्रस्तावापेक्षा चाळीस टक्के जास्त ऑफर दिल्याने अखेर एमजीएमवर ×ऍमेझॉनचा ताबा होणार आहे. करोना महामारीच्या कालावधीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने मनोरंजनाच्या या क्षेत्राकडे आता जास्त नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष दिले जात आहे.
त्यातूनच हा व्यवहार झाल्याचे समजते 97 वर्षाचा इतिहास असलेल्या एमजेएम स्टुडिओच्या लायब्ररीमध्ये चार हजारपेक्षा जास्त चित्रपट आणि 17000 टीव्ही शो आहेत. टेन अँग्री मेन, बेसिक इन्स्टिंक्ट, जेम्स बॉण्डचे सर्व चित्रपट, रोबोकॉप, रॉकी, सायलन्स ऑफ दि लॅम्ब असे अनेक महत्त्वाचे चित्रपट एमजीएमच्या लायब्ररीमध्ये आहेत. ज्याचा फायदा ऍमेझॉनला होणार आहे.