दुरखंडीतील दुर्दैवी दोस्त

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये वणव्यांनी हाहाकार माजवलेला आहे. सतत या विषयीच्या बातम्या आपल्याला वृत्तपत्रं आणि विविध वाहिन्या देत असतात. हा वणवा गेले कित्येक दिवस तिथं धुमसत असून त्याचा शेवट दृष्टिपथात नाही. या भडाग्नीमध्ये लाखो वृक्षांचा संहार तर झाला आहेच, पण तितक्‍याच प्राण्यांनाही प्राणांना मुकावं लागलं आहे. हे सगळं वाचून आणि (टीव्हीवर) पाहून मन सुन्न झालं आणि 2016 या वर्षी ऑस्ट्रेलियाला दिलेल्या भेटीत तेथील आणि फक्त तिथंच आढळणाऱ्या प्राण्यांच्या भेटीची आठवण तीव्रतेनं जागृत झाली.

ऑस्ट्रेलिया या खंडप्राय देशातच फक्त आढळणारे कांगारू, कोआला, अकिडना, वोंबॅट, प्लॅटिपस, वालाबी, एमू असे अनेक प्राणी आहेत. त्यातील काही आम्हाला फक्त पाहताच आले असं नाही तर काहींशी आमची गट्टीच जमली. त्यामुळे या प्राण्यांना आगीच्या भक्ष्यस्थानी पडावं लागलं हे कळल्यावर अंत:करणात खोलवर कुठंतरी वेदना जाणवली.
ऑस्ट्रेलियन शासनानं या सगळ्या ऑस्ट्रेलिया-विशिष्ट प्राण्यांना खूप काळजी घेऊन सुरक्षित ठेवण्याच्या योजना राबवलेल्या असूनही ही दुर्दैवी घटना घडली याचं फार दु:ख झालं. मेलबर्नजवळ एक विस्तीर्ण उद्यान विकसित केलेलं असून तिथं आपल्याला हे बहुतांश प्राणी अगदी जवळून पाहता येतात. काही प्राण्यांशी आपण संवादही साधू शकतो. अर्थात या प्राण्यांशी कसं वागायचं याच्या सूचना अगोदरच दिल्या जातात. तसंच प्राण्यांना खाद्य द्यायची इच्छा असेल तर तिथून विकत घेतलेलंच अन्न द्यावं लागतं. या कारणांनी प्राणी निरोगी आणि सुस्थितीत राहतात. कांगारू हा प्राणी अतिशय प्रेमळ आणि लाघवी आहे. अन्न दाखवताच कांगारू उड्या मारीत जवळ येतात आणि अगदी आपल्या हातातून खाद्य घेतात. राखाडी रंगाच्या या प्राण्याच्या मादीच्या पोटाजवळ एक पिशवी असून तीत ती तिचं पिल्लू ठेवते आणि त्याचं रक्षण करते-त्याचं संगोपन करते. शेकडो कांगारू या पार्कमध्ये मोकळे सोडलेले आहेत त्यामुळे फिरता फिरता त्यांना भेटता येतं. कोआला आणि वोंबॅट हे प्राणी काहीसे लाजाळू आणि भित्रे असल्यानं फारसे जवळ येत नाहीत. झुडपात किंवा झाडांच्या फांद्यांमध्ये बसून राहतात. हे दोन्ही प्राणी एखाद्या छोटेखानी अस्वलासारखे दिसतात.
अकिडना हा साळूसारखा दिसणारा प्राणीही आम्ही पाहिला. याच्या सर्वांगावर काटे असल्यानं आम्ही त्याच्या वाटेला गेलो नाही. याशिवाय हे अकिडना जमिनीतील कीटक शोधून खाण्यात मग्न दिसले. हाच साळू (पॉर्क्‍युपाइन) आणि अकिडनामधील फरक आहे. साळू हा शाकाहारी प्राणी आहे तर अकिडना सर्वान्नभक्षी आहे. अकिडना मादी अंडी घालते तर साळू मादी पिलांना जन्म देते.

ऑस्ट्रेलियातील प्राणी इतरत्र आढळणाऱ्या प्राण्यांपेक्षा खूपच वेगळे आहेत. प्लॅटिपस हा ऑस्ट्रेलिया-विशिष्ट प्राणी तर अंडी देणारा सस्तन प्राणी आहे. आहे की नाही निसर्गाचा चमत्कारिक आविष्कार? मात्र दुर्दैवानं आम्हाला प्लॅटिपस पाहता आला नाही.

एमू हा प्राणी मात्र आक्रमक असल्याचं आम्हाला आढळून आलं. आम्ही खाद्य दाखवताच अनेक एमू धावत आले आणि खाद्यासाठी केवळ एकमेकांवरच नव्हे तर आमच्यावरही हल्ला करू लागले. हा उडू न शकणारा पक्षी एवढा आक्रमक असेल असं वाटलं नव्हतं. खाद्याचं संपूर्ण पुडकं काबीज करून त्यातला एक जरा जास्तच हिंसक एमू त्यातील अन्न खाऊ लागला. इतर एमू जवळपास आले तरी त्यांना हुसकावू लागला. इतकंच काय पण खाऊन झाल्यावर आमच्याकडे पाठ फिरवून आपली पातळशी विष्ठा आमच्याजवळ टाकून तो चालता झाला! त्या वर्षीच्या आमच्या प्रवासातही आम्ही काही ठिकाणी वणवा लागल्यानं राख झालेले वृक्ष पाहिले होते. मात्र, त्या आगी मर्यादित होत्या. वणवा ही तिथली नित्याचीच बाब असली तरी सध्याचं अग्नितांडव न भूतो न भविष्यती अशा प्रकारचंच आहे.

इथले वैशिष्ट्यपूर्ण लाखो प्राणी सुमारे दोन महिने चाललेल्या अग्नितांडवामध्ये होरपळून नष्ट झाले यासारखं दुर्दैव ते कुठलं असू शकतं? आपण एवढीच आशा करू शकतो की हा वणवा लवकरात लवकर विझावा. गेले कित्येक महिने ऑस्ट्रेलिया भीषण दुष्काळाचा सामना करीत आहे. पाण्याचं मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष तिथं निर्माण झालं आहे. ऑस्ट्रेलियातील वाळवंटी भागात उंटही आहेत. लोकांसाठी असलेले पाण्याचे साठे उंट त्यातलं पाणी पिऊन संपवीत आहेत या सबबीवर ऑस्ट्रेलियन शासन दहा हजार उंटांची कत्तल करीत आहे हे वाचल्यावर मात्र मन विषण्ण झालं. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो प्राणी दगावत आहेत तर दुसरीकडे मानव आपल्या स्वार्थासाठी त्यांची बेसुमार कत्तल करीत आहे. राहून राहून एकच विचार मन विषण्ण करतो-ही वसुंधरा काय फक्त माणसाचीच जहागिरी आहे काय?

श्रीनिवास शारंगपाणी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.