ज्ञानकोशकार श्री.व्यं.केतकर

काही व्यक्‍ती अतिशय प्रतिभावंत असूनही त्यांना समाजाची साथ मिळत नाही. त्यांचे द्रष्टेपण तत्कालीन समाजाला समजत नाही. परिस्थिती त्यांची कोंडी करते, पण त्यांची आत्मनिष्ठा जबर असते. स्वतः विचारपूर्वक अंगीकारलेल्या कार्याविषयी जाज्ज्वल्य निष्ठा असते. सर्वसामान्य लोकांकडून अशा व्यक्‍तींना मानमान्यता मिळाली नाही म्हणून त्यांचे तेज लपून राहात नाही. ते झळाळून उठतेच. अशी काही श्रेष्ठ माणसे आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे त्यापैकी एक होय. डॉ. केतकरांनी ज्ञानकोशाचे बावीस खंड प्रकाशित केले. आजही ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर म्हणूनच महाराष्ट्र त्यांना ओळखतो.

दाभोळ जवळील अंजनवेल हे त्यांचे मूळ गाव. आज ते एन्‍रॉनच्या वीजनिर्मिती प्रकल्पामुळे लोकांना माहीत झाले आहे. त्यांचे वडील पोस्टखात्यात होते. त्यांची फिरतीची नोकरी. ते मध्य प्रांतात रायपूर येथे असताना 2 फेब्रुवारी 1884 रोजी केतकरांचा जन्म झाला. त्यांचे दुर्दैव असे की, अगदी लहानपणीच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. शिक्षणासाठी म्हणून ते मुंबईला आले, पण त्यांचे शिक्षणात मन रमेना. ते स्वातंत्र्याच्या कल्पनेने भारावलेले होते. त्यावेळी अमेरिकेत विद्यापीठीय शिक्षण जवळपास फुकट मिळत असे. तिथे ते 1907 साली कॉर्नेल विद्यापीठातून बीए व लगेच वर्षभरात एमए झाले. त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी ‘ढहश कळीीीं ेष उरीींश ळप खपवळर’ (भारतातील जातींचा इतिहास) नावाचा पीएचडीचा प्रबंध सादर केला आणि लगेचच्या वर्षी तो पुस्तकरूपाने प्रकाशितही झाला. ज्या माणसाचे भारतामध्ये असताना शिक्षणात लक्ष नव्हते, त्याची बुद्धिमत्ता तो अमेरिकेत गेल्यावर तिथल्या ज्ञानासाठी स्वागतशील असलेल्या वातावरणामुळे किती झपाट्याने आपले तेज विस्तारू लागली पाहा. अमेरिकेतून परतताना ते वर्षभर इंग्लंडमध्ये राहिले व इंग्लंडमध्ये त्यांचे ‘अप एीीरू कळपर्वीळीा’ हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. शंभर वर्षांपूर्वी परदेशप्रवास आणि भारतीय विषयांवरील पुस्तके तिथे प्रकाशित होणे हे आताइतके सोपे नव्हते.

भारतात आल्यावर डॉ. केतकरांनी मराठीत ज्ञानकोश तयार करण्याचा संकल्प सोडला. त्या वेळी माहितीची साधने अत्यंत अपुरी होती. इतिहास संशोधक वि. का. राजवाडे म्हणाले होते, “एवढे अवाढव्य काम पुरे करण्यासाठी एखाद्याची हयात खर्च होईल.’ लो. टिळक यांनाही हे काम अशक्‍य वाटत होते, पण डॉ. केतकरांची आत्मनिष्ठा आणि कार्यनिष्ठा इतकी होती की, आपल्या प्रकांड बुद्धिमत्तेने, व्यासंगाने आणि अपार मेहनतीने त्यांनी हे अपूर्व कार्य केवळ बारा वर्षांत बावीस खंड प्रकाशित करून पूर्ण केले.

4 मार्च 1917 रोजी ज्ञानकोश मंडळाची नोंदणी झाली व 1929 मध्ये ज्ञानकोशाचा शेवटचा, बाविसावा भाग सूची म्हणून प्रसिद्ध झाला. त्यांची बारा वर्षांची तपश्‍चर्या सफल संपूर्ण झाली. दुर्दैव असे की, केतकरांच्या हयातीत त्याचे महत्त्व फारच थोड्याजणांना पटले होते. पूर्ण आयुष्यातच हलाखी, अवहेलना यांना केतकरानी तोंड दिले, पण त्यांची जाज्ज्वल्य ज्ञाननिष्ठा सगळ्याला पुरून उरली.

आज मराठी विश्‍वकोश मंडळाचा विचार केला तर केतकरांनी केलेल्या डोंगराएवढ्या कामाचे आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. आज या कामासाठी कर्मचारीवर्ग, स्वतःची वास्तू, कार्यालय, छापखाना, आधुनिक तंत्रज्ञान सगळे सरकारने पुरवून पन्नास वर्षे झाली तरी विश्‍वकोश-निर्मिती प्रकल्पाचे काम रखडले आहे. डॉ. केतकरांनी त्या काळात हे खंड एकट्याच्या बळावर प्रकाशित तर केलेच पण ते घरोघरी फिरून स्वतः विकले. त्यासाठी ग्रंथांचे गठ्ठे घेऊन ते बैलगाडीतून खेडोपाडी फिरले. आज रेल्वेच्या डब्यात बारकी पोरं काहीतरी विकत फिरतात; तसे हा श्रीधर व्यंकटेश केतकर नावाचा ज्ञानपुरुष स्वतः रेल्वेच्या डब्यात उभे राहून हे खंड विकत असे आणि ही गोष्ट त्यांनी उत्साहाच्या भरात एकदोनदा नव्हे तर सातत्याने व वर्षानुवर्षे केली.

स्वभाषा, स्वदेश आणि स्वराज्य यासाठी आयुष्य वेचणाऱ्या केतकरांनी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी अनेक मार्ग सुचवले. डॉ. केतकरांची प्रतिभा ज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात विहार करणारी होती. मातृभाषेतून शिक्षण, स्त्री-पुरुष समानता यांचा त्यांनी पुरस्कार केला. समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, काव्यविचार, राजकारण अशा अनेक विषयांवर त्यांनी मूलभूत, स्वतंत्र स्वरूपाचे लेखन केले. केतकरांचा द्रष्टेपणा त्यांच्या लेखनात जागोजागी दिसतो. नगररचनाशास्त्र, नगररचनेचे माणसांच्या कार्यक्षमतेवर व स्वभावावर होणारे परिणाम, व्हीपीने माल विकण्याची पद्धत, मध्यमवर्गीय स्त्रिया उद्योगक्षेत्रात आल्यामुळे होणारे परिणाम, जाहिरातींची आवश्‍यकता आणि व्यापारवृद्धीतील त्यांचे महत्त्व अशा अगदी वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी त्या काळात लिहून ठेवले आहे. त्यांनी त्यांच्या कथाकादंबऱ्यांतून रंगवलेल्या स्त्रिया समाजाच्या सर्व स्तरांतील व बौद्धिक चर्चामधे सहभागी होणाऱ्या, परंपरेला धुडकावणाऱ्या अशा आहेत.
केतकरांचे लेखन म्हणजे पांडित्य व प्राचंड्य यांचा मिलाफ होता. समाजशास्त्र, वेदविद्या, मानवशास्त्र यासारख्या क्षेत्रात मूलगामी संशोधन करणारे केतकर नव्या, “एका वेगळ्या जगाची’ कल्पना मांडणारे आद्य विचारवंत होते. ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे ग्रंथकार आणि कोशकार म्हणून महत्त्व आहेच, पण महाराष्ट्रातील एक द्रष्टा समाजशास्त्रज्ञ, विचारवंत म्हणूनही त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

माधुरी तळवलकर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.