मुंबई, – 31 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. त्या निमित्ताने दि. 27 मार्च ते 10 एप्रिल 2022 दरम्यान तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा “विशेष सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी निर्देश दिले आहेत.
या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त तृतीयपंथी लोकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघाच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रात तृतीयपंथी मतदारांचा शोध घेऊन त्या कार्यक्षेत्रात शिबीर आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.