नीरा – पुरंदर तालुक्यातील अंबोडी येथे तीन दिवसांपूर्वी एका दोन दिवसांच्या अर्भकाला जिवंत गाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना गजाआड करण्यात सासवड पोलिसांना यश आले आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची म्हणजेच बुधवार (दि. 4) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणारा प्रेमसंबंधाची किनार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अरबाज इक्बाल बागवान, अनिकेत संपत इंगोले (दोघे रा. सासवड, ता. पुरंदर) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी (दि. 28) अंबोडी येथे वनविभागाच्या हद्दीलगत शेतामध्ये एका दोन दिवसाच्या अर्भकाला जिवंत गाडण्याचा प्रयत्न दोघांकडून सुरू होता. मात्र, शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे तो फसला होता. या घटनेतील आरोपींची पोलिसांना कोणतीही प्रकारची माहिती नव्हती किंवा पुरावे नव्हते. मात्र, यानंतर सुद्धा सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त माहिती गारातर्फे माहिती मिळवून पोलिसांनी शनिवारी या दोघांना गजाआड केले असून त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
अरबाज बागवान याचे 20 वर्षीय तरुणी सोबत प्रेम संबंध होते. यातून या मुलाचा जन्म झाला. एका हॉस्पिटलमध्ये दोघे नवरा-बायको असल्याचे भासून त्यांनी डिलिव्हरी करून घेतली. यानंतर हे बाळ मी सांभाळतो असे म्हणून पीडित मुलीकडून हे अर्भक अरबाजने ताब्यात घेत इंगोलेबरोबर अर्भक गाडण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी. एस. हाके यांच्या निर्देशानुसार सहायक निरीक्षक राजेश माने, महेश खरात, महेश उगले, राजेश खर्चे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पुढील तपास राजेश माने हे करीत आहेत.