fbpx

‘भ्रष्टाचाराची मालिका पुढे चालवण्यासाठी निष्क्रिय सरकारची धडपड’

भाजपा युवा मोर्चाचे राज्य प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा आरोप

इस्लामपूर (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीचे निष्क्रिय सरकार आज जाईल की उद्या जाईल, अशा परिस्थितीत आहे. भ्रष्टाचाराची मालिका पुढे चालवण्यासाठी सरकारमधील तिन्ही पक्षांचा खटाटोप सुरू आहे. घरी बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे सरकारची सूत्रे आहेत, असा आरोप भाजपा युवा मोर्चाचे राज्य प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

येथील नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलात पत्रकार परिषद झाली. प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक,
भाजपा प्रदेश कार्यकारिणी समिती सदस्य सम्राट महाडिक, युवा मोर्चाचे सरचिटणीस सुशील मेंगडे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप मोरे, सुदर्शन पाटसकर, प्रदेश सचिव प्रवीण फोंडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रोहित पाटील उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, कोविड काळात संपूर्ण राज्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर होती. असे असताना अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची घाई सरकारने का केली? हा संशोधनाचा विषय आहे. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. अपमानित झालेला शेतकरी मिळालेली तुटपुंजी मदत सरकारच्या तोंडावर फेकून फेकून मारेल अशी परिस्थिती आहे. शेती संबंधी कोणतेही ज्ञान नसलेला मुख्यमंत्री सत्तेवर असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

ते म्हणाले, कोविड काळात अनेक युवकांच्या नोकर्‍या गेल्या अनेक नवउद्योजकांना फटका बसला. बेरोजगार झालेल्या युवकांसाठी शासनाने आता कोविड निर्वाह भत्ता द्यावा, अशी सरकार दरबारी मागणी केली होती. मात्र या मागणीला सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. करोनाच्या महामारीच्या निमित्ताने केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अंतर्गत वीस लाख कोटींचे पॅकेज देशाला दिले. राज्य सरकारकडून युवक, विद्यार्थ्यांना फुटकी कवडी सुद्धा या सरकारने दिलेली नाही. केंद्र सरकार मदत करते पण राज्य सरकार काही करू शकत नाही. आता हे राज्य सरकारच निष्क्रिय आहे. खुर्ची टिकवणे यासाठी तिन्ही राजकीय पक्षांची खटाटोप सुरू आहे.

युवकांना विद्यार्थ्यांना काही देणार नाही तर आम्ही गप्प बसणार नाही. युवकांना आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी भाजपा युवा मोर्चा कार्यरत असणार आहे. ६९ जिल्ह्यामध्ये आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून युवक नवउद्योजकांना मदत व्हावी, केंद्र सरकारच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचवता याव्यात यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.

ते म्हणाले, भाजपा युवा मोर्चा हे देशप्रेमाने प्रेरित झालेली संघटना आहे. नेत्याच्या मागेपुढे करण्यासाठी युवा अशी व्याख्या आमच्या तत्वात बसत नाही. विचारधारेने प्रेरित होऊन काम करणारी राष्ट्राला प्रथम प्राधान्य या धर्तीवर आम्ही काम करीत आहोत. आपल्या स्व-कर्तृत्वाने सेवा भावनेने काम करतोय. युवा कार्यकर्ते आमच्याकडे आकर्षित होत आहेत. सत्ता असली अथवा नसली तरी संघटनेच्या माध्यमातून युवा शक्तीचा उपयोग आम्ही सकारात्मकपणे करत आहोत. तरुणांमध्ये सध्या प्रचंड उत्साह दिसत आहे.

विक्रांत पाटील म्हणाले,  करोनाच्या काळात आमच्या कार्यकर्त्यांनी कम्युनिटी किचन सुरू केली होती. 80 लाख नागरिकांना फुड पॅकेट्स वितरित केली आहेत. स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेली धावाधाव लक्षवेधी आहे. त्यांना शाबासकी देण्याच्या निमित्ताने आम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत. पदवीधर मतदार संघात नोंदणी पासून अनेक जण वंचित आहेत. त्यांची नोंदणी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.

युवा मोर्चाचे चिटणीस प्रवीण फोंडे, सचिव जगन्नाथ पाटील, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका वैशाली खाडे, श्रवण जंगम श्री निंबाळकर,पंकज भुजबळ, समर्थ बडे, आनंद जोशी परेश गुजरे, चेतन माडगूळकर, रोहित पाटील उपस्थित होते.

पंकजाताई मुंडे या नाराज आहेत अशा वावड्या उठवल्या जात आहेत. त्या पुर्ण ताकदीने पक्षाच्या निर्णय प्रकियेत असतात. तर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांच्या बद्दल बोलताना विक्रांत पाटील यांनी ते मोठे नेते आहेत. त्यांच्या निर्णयावर मी काय बोलणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.