सविंदणे (वार्ताहर) – कवठे येमाई (ता. शिरूर) येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. या होणार्या प्रकारामुळे नागरिक पुरते वैतागले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा असे म्हणत नागरिकांनी थेट आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकले आहे.
प्रसुती झालेल्या महिलेला मंगळवारी (दि.30 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास उपचार न घेताच कंटाळून घरी परतण्याची दुर्दैवी वेळ आली. हा प्रकार ग्रामस्थांना कळताच त्यांनी वैद्यकीय अधिकार्यांना संपर्क केला. परंतु संपर्क न झाल्याने ग्रामस्थांनी संतप्त होत रूग्णालयाला टाळे ठोकल्याचा प्रकार घडला.
दुसर्या दिवशी बुधवारी (दि. 1) माजी पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे व ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांशी फोनवर चर्चा केली. त्यांनी लवकरच कायमस्वरूपी नवीन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर टाळे उघडण्यात आले.
कवठे येमाईत प्राथमिक आरोग्य केंद्र असून वरूडे, मोराची चिंचोली, सविंदणे, कान्हूर मेसाई या गावांवरून नागरिक उपचारासाठी येथे येतात; परंतु पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही. निवासस्थान वापराविना धुळ खात पडले असून त्यामध्ये मोडक्या खुर्चा अस्ताव्यस्त पडल्या आहे.
विद्युत केबलची ही दुरवस्था झाली असून यामुळे कधीही आग लागू शकते. डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी दवाखान्याची वाट धरावी लागते. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतात. गोरगरीब रुग्णांना उपचार घेताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.
कवठे येमाई आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी लवकरच कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी देण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच याबाबत आरोग्य उपसंचालक यांची भेट घेणार आहोत.- डॉ.सुभाष पोकळे, माजी सदस्य, पंचायत समिती
कवठे येमाई येथील घटनेबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांना संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे ते अधिक माहिती देऊ शकतील. त्यांच्याशी संपर्क करा. – डॉ. सचिन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी
कवठे येमाई येथील आरोग्य केंद्राशेजारी मंगळवारी आग लागली होती. त्यामुळे रुग्णांना इजा होऊ नये म्हणून टाळे लावले होते. अशी माहिती समजली. सध्या दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून ओपीडी सुरू आहे.
ग्रामस्थांनी टाळे लावले याबाबत मला कोणतीही माहिती नाही. आरोग्य केंद्र दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शस्त्रक्रिया विभाग बंद आहे. त्यासाठी केंदूर या ठिकाणी शस्त्रक्रिया केल्या जात आहे. – डॉ. राजेश कट्टीमणी, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी