वॉशिंग्टन – सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांना सौदीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या हत्येचा कट केल्याच्या आरोपात अमेरिकेतील खटल्यातून कायदेशीर अभय देण्याचा विचार ट्रम्प प्रशासन करत आहे. या संदर्भात सौदीच्या राजपुत्राकडून मिळालेल्या विनंतीचा अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाकडून विचार केला जात आहे. या संदर्भातील अहवाल अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांना दिला जाणार आहे.
राजपुत्र मोहम्मद यांच्याविरोधात वॉशिंग्टनमधील फेडरल कोर्टात ऑगस्टमध्ये खटला दाखल करण्यात आला होता. अमेरिकेमध्ये पूर्वी कार्यरत असलेले सौदीचे उच्चपदस्थ साद अल्जाबरी यांच्या हत्येसाठी अमेरिकेत कारस्थान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अल्जाबरी यांच्या हत्येसाठी सौदीतून मारेकरी पाठवल्याचाही आरोप राजपुत्र मोहम्मद यांच्यावर आहे. या कायदेशीर अभयामुळें राजपुत्र मोहम्मद यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अन्य प्रकरणात प्रतिवादी केले जाणार नाही. यातील एक प्रकरण सौदीचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या 2018 मध्ये झालेल्या हत्येशीही संबंधित आहे.
अमेरिकेत तपास झाल्यावर अल्जाबरी यांच्या हत्येचे कारस्थान केल्याबद्दल राजपुत्र मोहम्मद यांच्याविरोधात तपास केला गेला आणि या संदर्भात आंतरराष्ट्रीय दबाव देखील वाढला आहे. राजपुत्र मोहम्मद यांनी पाठवलेले मारेकरी कॅनडातून अमेरिकेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना थांबवले गेले.
राजपुत्र मोहम्मद यांच्या उद्योगविषयक धोरणाविषयी संवेदनशील माहिती आपल्याकडे असल्यानेच आपल्या हत्येचा कट केला गेला असल्याचे अल्जाबरी यांनी म्हटले आहे.