पुणे (प्रतिनिधी) – कोंढापुरी (ता. शिरूर) येथील एका कंपनीतील कॅंटीन कंत्राट मिळविण्यासाठी कंपनीच्या प्लॅंटहेडवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपाच्या प्रकरणात एकाला सत्र न्यायाधीश आर.जी.देशपांडे यांनी अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. या प्रकरणात यापूर्वी तिघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.
प्रमोद गोपाळराव गायकवाड असे अटकपूर्व मिळालेल्याचे नाव आहे. त्याने ॲड. विवेक भरगुडे, ॲड. कुमार पायगुडे आणि ॲड. गणेश शेंडकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. 30 नोव्हेंबर रोजी शिक्रापूर येथे पोलिसांनी ही कारवाई केली.
या प्रकरणात गुन्ह्यात अटक केलेले 20 ते 25 वर्षाचे तरूण आहेत. गायकवाड याचे वय 47 आहे. गायकवाड याचा त्या तरूणांशी आणि गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. कोणत्याही तिऱ्हाईत व्यक्तीने त्याच्या विरोधात तक्रार दिलेली नाही. त्यामुळे गायकवाड याला अटकपूर्व मंजुर करण्याची मागणी ॲड. विवेक भरगुडे यांनी केली.
त्यानुसार तपासास सहकार्य करणे, पुराव्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर मंगळवार, गुरूवारी पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालयाने हा निकाल दिला.