साताऱ्यात ओढे-नाले सफाईला वेग

आरोग्य सभापती यदुनाथ नारकर यांचे नियोजन; 24 कर्मचारी शहरात सफाई मोहिमेवर

सातारा – पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने सातारा शहरातून आणि आसपासच्या भागातून वाहणाऱ्या नाल्यांच्या सफाईच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. अतिक्रमण विभागाने चार पोकलेनच्या साहाय्याने नाले सफाईला सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यातील कामाला दोन आठवड्यापूर्वीच सुरुवात केली आहे. शहर आणि लगतच्या भागातून साधारणतः 24 ओढे नाले वाहतात, त्यांच्या सफाईची मोहीम सप्टेंबर अखेरपर्यंत चालणार असल्याची माहिती आरोग्य सभापती यदुनाथ नारकर यांनी दिली.

साताऱ्यातून सुळाचा ओढा, जांभळी ओढ्यासह लहान मोठे चोवीसहून अधिक ओढे शहरात समांतरपणे वाहत जाऊन माहुली येथे कृष्णा नदीला मिळतात. मोठ्या नाल्यांची सफाई लंबे बोळ गवंडी बोळ मटंगे पूल, झारीचा बोळ येथे नालेसफाई क्रमप्राप्त ठरली होती. नगराध्यक्ष माधवी कदम व आरोग्य सभापती यदुनाथ नारकर यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची पालिकेत बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दोन जेसीबी दोन डंपर व 24 कर्मचारी शहरात सफाई मोहिमेवर सक्रिय आहेत.

सध्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले असून त्यात बुधवार पेठ, रामाचा गोट, कात्र वाडा टाकी परिसर आरटीओ कार्यालयाच्या मागच्या नाल्याचे काम प्रत्येकी एका पोकलेनच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे.
गेल्या वर्षीही नालेसफाईच्या कामाला उशिरा सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी हे काम निविदा प्रक्रियेत अडकले होते. मात्र यावेळी आचारसंहिता लागू असल्याने अंदाजपत्रक काढणे निविदा प्रक्रिया लागू करणे या बाबींना वेळच मिळाला नाही त्यामुळे मागच्याच निविदेतील दरांना मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

शहर परिसरात वाहणारे नाले सफाईला प्रदीर्घ कालावधी लागत असल्याने पहिल्या टप्प्यात पाणी तुंबण निचरा न झाल्याने रस्त्यांवर पाणी वाहणे असे प्रकार जिथे घडतात त्या भागात पहिल्या टप्प्यातील नाले सफाई करण्यात येणार असून त्यानंतर कमी तीव्रतेच्या ठिकाणची साफसफाई करण्यात येणार आहे. शिवाय आपल्याकडे रिटर्न मान्सूनचा जोर चांगला असल्याने ही मोहीम सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे नारकर यांनी सांगितले.

नालेसफाई सुरू असलेल्या भागातून नागरिकांच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार नाले सफाई झाल्यानंतर उपसलेली झुडपं, गाळ पालिका उचलून नेत नाही. मात्र वस्तुस्थिती तशी नसल्याचे न.पा.च्यावतीने सांगण्यात येत असून, झुडपं वगैरे कचरा गाळ उपसलेल्या ठिकाणाहून उचलला जातो, मात्र गाळाची माती होत असल्याने तो उचलला जात नाही मात्र नाल्या ओढ्यांच्या दोन्ही बाजूचा भराव वाढविण्यासाठी तो वापरला जातो.
शहरातील कामाटीपुरा भागातून वाहणाऱ्या ओढ्यांच्या बाबतीत पुढे वायसी कॉलेजजवळ हा नाला अत्यंत चिंचोळा होत असल्याने तेथे पाणी तुंबून रस्त्यावर येते या परिसरात पाण्याचे मोठे डबके तयार होते त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.