पुणे -करोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास गेली दीड वर्षे बंद असणारी नाटकाची घंटा आता वाजणार आहे. यानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या वतीने वाघाची गोष्ट’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे.
मार्च 2020 पासून टाळेबंदी आणि इतर अनेक निर्बंधामुळे महाराष्ट्रभर सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांचे प्रयोग ठप्प झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही एकत्र येत आपली कला सादर करता येत नव्हती.
मात्र, आता हे निर्बंध शिथिल केल्याने शुक्रवारी (दि.22) सायंकाळी 6.30 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील नामदेव सभागृह येथे ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रमांतर्गत वाघाची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात येणार आहे.
मूळ इटालियन भाषेतील हे नाटक दारिओ फो या नोबेल पुरस्कार विजेत्या नाटककाराने लिहीलेले असून त्याचा मराठी अनुवाद विनोद लव्हेकर यांनी केला आहे. या नाटकाचे दिग्दर्शन महेश खदारे यांनी केले आहे.
शुभम साठे आणि ऋत्विक तळवलकर हे या नाटकात अभिनय करत आहेत. नाटकाचा कालावधी एक तास आहे. याप्रसंगी महाराष्ट्रातल्या नाटकघरांची सुरवात म्हणून तिसरी घंटा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार देणार आहेत.
शासन नियमांनुसार सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे, असे ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी सांगितले.