पिंपरी, (वार्ताहर) – तत्कालीन राज्य सरकारच्या अनास्थेमुळे रखडलेल्या पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला आता मुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गती मिळाली आहे.
या मार्गिकेचा ५० टक्के खर्च करण्यास अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे. त्यामुळे मार्गिकेचे काम लवकरच सुरु होईल. मार्गिकापूर्ण झाल्यानंतर लोकल वेळेत धावतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे खासदार बारणे यांनी सांगितले.
केंद्र सरकारने २०१५-१६ मध्ये पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसरा आणि चौथ्या ट्रॅक करण्याची घोषणा केली. त्याचा विकास आराखडा (डीपीआर) तयार केला. त्यासाठी २०१७ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद देखील केली.
परंतु, डीपीआर तयार करताना त्याचा खर्च १६०० कोटी होता. २०२२ मध्ये खर्च २२०० कोटी रुपयांवर गेला. आता ५ हजार १०० कोटी रुपयांपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचा खर्च गेला आहे.
त्यात जागा भूसंपादनासह सर्व कामाचा समावेश आहे. याचा ५० टक्के खर्च केंद्रीय रेल्वे विभाग आणि ५० टक्के राज्य सरकार अशी खर्चाची विभागणी आहे. राज्याच्या ५० टक्यांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहभाग राहणार आहे.
खासदार बारणे यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक घेतली. मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिस्सा देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार ५० टक्के हिस्सा देण्यास अर्थसंकल्पात मान्यताही दिली आहे. यामुळे यामुळे तिसरा, चौथा ट्रॅक मार्गी लागणार आहे.