वडगाव मावळ – वन विभागाच्या वडगाव मावळ कार्यालयातील मुद्देमालच्या बंदिस्त खोलीतून गुन्ह्यात जप्त केलेल्या एका दुचाकीची चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. बंदिस्त खोलीतून दुचाकी चोरीस गेल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून वन विभागाच्या भोंगळ कारभाराची चर्चा मावळ तालुक्यात सुरू आहे.
याप्रकरणी वन परिमंडळ अधिकारी प्रमोद मुगुटराव रासकर यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ येथील वन विभागाच्या कार्यालयातील मुद्देमालच्या बंदिस्त खोलीतून वन विभागाकडे तपासास असलेले दाखल गुन्ह्यातील टी.व्ही.एस कपनीची फोनक्स १२५ मोटार सायकल (एमएच १४ ईजी ७२४४) ही दिनांक ८ जानेवारी २०१९ ते १ नोव्हेंबेर २०२३ या कालावधीत कोणीतरी अज्ञात इसमाने वन विभागाच्या संमतीशिवाय, मुद्दाम लबाडीच्या इराद्याने, त्याचे आर्थिक फायदयाकरीता, अप्रामाणिकपणे चोरून नेली असल्याची फिर्याद वन परिमंडळ अधिकारी रासकर यांनी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार आशिष काळे हे करत आहेत.
वडगाव मावळ येथील वन विभागाचे सुरक्षा भिंती असलेल्या कार्यालयातील मुद्देमालाच्या बंदिस्त खोलीतून गुन्ह्यात जप्त केलेल्या एका वाहनाची चोरी झाल्याची घटना वनविभागाच्या अधिकाऱ्याना व कर्मचाऱ्यांच्या १ नोव्हेंबेर रोजी लक्षात आली आहे. यामुळे वनविभागच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजावर संशय निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सन २०१९ म्हणजेच मागील चार वर्षांपासून वन विभागाने जप्त करून ठेवलेली दुचाकी नक्की कधी चोरीस गेली याचा त्यांच्या अधिकारी व कर्मचारी यांना पत्ताच नाही. त्यात वडगाव येथील वन विभागाच्या कार्यालयास उत्तम प्रकारच्या सुरक्षा भिंती व गेट आहे तसेच या कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे देखील असताना बंदिस्त असलेल्या मुद्देमालाच्या खोलीतून वाहन चोरीस गेलेच कसे व मागील चार वर्षांच्या कालावधीत वाहन नक्की कधी चोरीस गेले याची कल्पनाही वन विभागास नाही. यामुळे या चोरीच्या घटनेमुळे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडेच संशयाने पहिले जात आहे.
गुन्ह्यातील मुद्देमालची चोरी झाल्याने पुढील काळात जेव्हा या गुन्ह्यातील आरोपीने वाहनाची मागणी केल्यास वन विभाग त्यास त्याची दुचाकी कोठून उपलब्ध करून देणार, असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत.
इतरही साहित्याची तपासणी होणे गरजेचे
वन विभागाच्या बंदिस्त कार्यालयातून दुचाकी चोरीला गेली आहे. यामुळे वन विभागाने जप्त केलेल्या सर्व साहित्याची तपासणी करणे गरजेचे आहे. केवळ दुचाकी चोरीस गेली आहे की इतर वस्तूही चोरीस गेल्या आहेत, याची तपासणी वरिष्ठ अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे.