नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे संसदेच्या विशेष (Parliament of India) अधिवेशनच्या निमित्ताने दिल्लीला गेले आहेत. संसदेत आज महिला आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले आहे.
हे विधेयक मंजूरही होण्याची शक्यता असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (praful patel) आणि शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या कॅफेटेरियातील भेटीवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या. या सर्व नेत्यांनी नवीन राज्यसभा सभागृहात एकत्रित फोटो काढला आहे, हा फोटो प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवर शेअर केला आहे.
एकीकडे अजित पवारांनी सत्तेत सहभागी होत वेगळी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडलीय. दोन्ही गटांमध्ये आता कायदेशीर लढाई होणार आहे.
निवडणूक आयोगात पुढच्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवातही होणार आहे. यातच प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट झाल्याने घटनेमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.